मनोरंजन

संगीतप्रधान ‘अष्टपदी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

३० मे रोजी प्रदर्शित संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

मुंबई : 

‘अष्टपदी’ हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही. ३० मे रोजी ‘अष्टपदी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची उत्कंठावर्धक झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘अष्टपदी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना एक संगीतप्रधान कौटुंबिक कलाकृती पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित झालेल्या ‘अष्टपदी’च्या ट्रेलरच्या काव्यमय सुरुवातीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही निर्माते उत्कर्ष जैन यांनीच केले आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी कथा, पटकथा व संवाद लेखन केलं आहे. प्रदर्शित करण्यात आलेला ‘अष्टपदी’चा ट्रेलर खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा आहे. ‘कुणीच नसावं अवतीभवती, समोर तू असताना…’ अशा काव्यरचनेने ‘अष्टपदी’चा ट्रेलर सुरू होतो. त्यानंतर संतोष जुवेकरच्या रूपातील कवीमनाचा नायक दिसतो आणि त्याने जिच्यासाठी हे काव्य म्हटले ती नायिका मयुरी कापडणेही लक्ष वेधून घेते. प्रेमाचे विविध रंग उधळणारी दृश्ये ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात, जी ‘अष्टपदी’बाबत उत्सुकता वाढवतात. थोडक्यात काय तर या चित्रपटात प्रेमाची अनोखी व्याख्या पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. याला सुमधूर गीत-संगीत आणि अर्थपूर्ण संवादांची जोड देण्यात आली आहे. दोन नायक आणि एक नायिका असलेल्या या चित्रपटात खरं प्रेम कुणाला मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सशक्त कथानक, उत्कंठा वाढवणारी पटकथा, सहजसुंदर अभिनय, प्रयोगशील दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये यांच्या आधारे ‘अष्टपदी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अष्टपदी’बाबत निर्माते-दिग्दर्शक उत्कर्ष जैन म्हणाले की, हा चित्रपट प्रेमाची नवी व्याख्या मांडणारा आहे. प्रेमाचे आजवर कधीही समोर न आलेले पैलू पाहताना प्रत्येक रसिकांना कुठे ना कुठे त्यात आपले प्रतिबिंब दिसेल. आजच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे सर्वतोपरी मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे ‘अष्टपदी’ पाहताना रसिकांना जाणवेल. ‘अष्टपदी’ या चित्रपटाला जर आर्थिक यश लाभलं तर त्यातील काही भाग राष्ट्रीय संरक्षण निधीला देणार असल्याचे उत्कर्ष जैन यांनी सांगितले.

‘अष्टपदी’मध्ये संतोष आणि मयुरी यांच्या जोडीला अभिनय पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर , विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, विशाल अर्जुन, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे या कलाकारांचाही समावेश आहे. गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी सुमधूर स्वरसाज चढवला आहे. मिलिंद मोरे यांनीच या चित्रपटाला पार्श्वसंगीतही दिलं असून, कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलं आहे. रंगभूषा अतुल शिधये यांनी, तर वेशभूषा अंजली खोब्रेकर व स्वप्ना राऊत यांनी केली आहे. डिओपी धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे. अजय खाडे ‘अष्टपदी’चे कार्यकारी निर्माते आहेत, तर राहुल पाटील आणि नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *