
मुंबई :
गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी दिलासादायक ठरत असून, जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत केवळ मुंबई व उपनगरांतील एकूण ५२५ रुग्णांना ४ कोटी ९५ लाख रुपये इतकी आर्थिक मदत या निधीतून प्रदान करण्यात आली आहे.
या कालावधीत मुंबई शहरातील ३२८ व उपनगरांतील १९८ रुग्णांना लाभ मिळाला आहे. सर्वाधिक रुग्णांनी कॅन्सर शस्त्रक्रियेसाठी (९५ रुग्ण) निधीचा लाभ घेतला असून, त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना एक प्रकारचे वरदान ठरत आहे, अशी भावना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.
सर्वाधिक मदत मिळालेल्या आजारांचे तपशील :
- कॅन्सर – ९५
- मेंदूच्या आजारांवरील उपचार – ४६
- कॅन्सरवरील किमोथेरपी / रेडिएशन – ३९
- हिप रिप्लेसमेंट – ३०
- हृदयविकारावरील उपचार – २९
मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये :
मुंबई शहर :
- सैफी हॉस्पिटल – ९ रुग्ण
- बॉम्बे हॉस्पिटल अँड खुबचंदानी कॅन्सर सेंटर – ८
- हिंदुजा हॉस्पिटल – ८
- रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल – ७
- जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर – ७
मुंबई उपनगर :
- साई मेडिकेअर अँड साई हॉस्पिटल, चेंबूर – ३०
- आरएमएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कांदिवली – २९
- स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजी, घाटकोपर – २६
- होली स्पिरिट हॉस्पिटल, अंधेरी – २०
- बेंझ मल्टीस्पेशालिटी, सांताक्रूझ – १६
सामान्य नागरिकांच्या वैद्यकीय गरजांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या योजनेबाबत राज्यभरातून समाधान व्यक्त होत असून, निधी वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व वेग वाढवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
मदतीचा वाढता आलेख :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मदतकार्याचा आलेख सातत्याने वाढत आहे. खालीलप्रमाणे महिन्यावार मदतीचे आकडे स्पष्टपणे दर्शवितात की, गरजू रुग्णांसाठी ही योजना किती परिणामकारक ठरते आहे.
डिसेंबर २०२४ : १३९२ रुग्ण – १२ कोटी २१ लाख रुपये
जानेवारी २०२५ : १७८८ रुग्ण – १५ कोटी ८१ लाख २७ हजार रुपये
फेब्रुवारी २०२५ : २०७० रुग्ण – १८ कोटी ३४ लाख रुपये
मार्च २०२५ : २५२१ रुग्ण – २२ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये
एप्रिल २०२५ : २४३० रुग्ण – २१ कोटी ३२ लाख रुपये.