
मुंबई :
दहावीनंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे २०२५ पासून सुरू होत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय आहे. अल्पकालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यार्थ्यांना या शाखेकडे आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थी तंत्रज्ञ, अभियंता व यशस्वी उद्योजक होऊ शकतात. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील, वेळापत्रक, नाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
१) जात, जमात प्रमाणपत्र
२) जात, जमात वैधता प्रमाणपत्र
३) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
४) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार.
५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र
७) दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र
८) सैन्य दलातील संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
९) आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते : शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती इ. योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक.
काम करत शिकणाऱ्या उमेदवारांसाठी
वर्किंग प्रोफेशनल योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीकृत उद्योग किंवा आस्थापना, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित कंपनी किंवा एमएसएमई अशा ठिकाणी नियमितपणे १ वर्ष काम करीत असल्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र. तसेच अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी संबंधित आस्थापनेचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.