शिक्षण

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १६ जूनपर्यंत करता येणार अर्ज; वेळापत्रक जाहीर

मुंबई :

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार https://poly25.dtemaharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर २० मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली, असून विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

तीन वर्ष कालावधीच्या, पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठीचे  वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० मे पासून १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन व प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. त्यानंतर निश्चित होणारे अर्ज हे संस्थास्तरावरील फेरीसाठी विचारात घेण्यात येणार आहे. १८ जून रोजी संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये दर्शविलेल्या माहितीमध्ये विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास १९ ते २१ मे दरम्यान विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवता येणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे – २० मे ते १६ जून
  • प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे – २० मे ते १६ जून
  • तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे – १८ जून
  • तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भात हरकत सादर करणे –१९ ते २१ जून
  • गुणवत्ता यादी जाहीर करणे – २३ जून

अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

प्रवेश अर्ज भरण्याबरोबरच प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७/ १८००३१३२१६४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हा हेल्पलाईन क्रमांक सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरु राहणार आहे.

प्रवेशासाठी शुल्क

राज्यातील खुल्या प्रवर्ग, राज्याबाहेरील आणि जम्मू काश्मिर व लडाख या संघराज्यातून विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये, तसेच राज्यातील सर्व राखीव प्रवर्ग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये शुल्क अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *