
मुंबई :
खेळता खेळता एका १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेमध्ये तीक्ष्ण धातूचा तुकडा(हँडबॅगच्या चैनचा स्टॉपर) अडकल्याची घटना मुंबईत घडली. लक्षात येताच परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये दाखल करुन त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. बालरोग ईएनटी तज्ज्ञ डॉ. बालगोपाल कुरूप यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने हा अडकलेला धातूचा तुकडा सुरक्षितपणे काढून टाकला. याकरिता या बाल रुग्णाला भूल देऊन एसोफॅगोस्कोपी (अन्ननलिकेची एंडोस्कोपी) करण्यात आली.
मुंबईत राहणाऱ्या रोहित यादव (नाव बदलले आहे) यांच्या बाळाला अचानक तीव्र खोकला झाला असून त्याची प्रचंड चिडचिड होत होती. त्यामुळे त्यांनी बाळाला बालरोग तज्ज्ञांकडे नेले. २ आठवडे उपचार केल्यानंतरही बाळाला जेवताना खोकला आणि त्याची चिडचिड प्रचंड वाढली होती. त्यानंतर एक्स-रे करण्यात आला ज्यामध्ये अन्ननलिकेमध्ये एक धातूची वस्तू अडकल्याचे आढळून आले. घाबरलेल्या पालकांनी बाळाला त्वरीत वाडिया रुग्णालयात दाखल केले. हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या जवळ असलेल्या अन्ननलिकेच्या मध्यभागी धातूची टोकदार वस्तू अडकल्याचे दिसत होते त्यामुळे श्वासनलिकेवर त्याचा दाब पडत होता. मुलाने ती वस्तू कधी आणि कशी गिळली याची पालकांना माहितीच नव्हती.
मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधील ईएनटी आणि पेडियाट्रिक ऑटोरिनोलॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बालगोपाल कुरूप सांगतात की, मुलाला सामान्य भूल देऊन एसोफॅगोस्कोपी करण्यात आली. ही प्रक्रिया सुमारे एक तास चालली. ब्रोन्कोस्कोपी (श्वास नलिकेची एंडोस्कोपी) श्वास नलिकेमध्ये दाब दिसून आला . एसोफॅगोस्कोपीमध्ये अन्ननलिकेच्या मध्यभागी एक तीक्ष्ण धार असलेल्या धातूचा तुकडा आढळून आला ज्यामुळे त्याभागात व्रण आणि सूज दिसून आली. पेडियाट्रिक ऍनेस्थेशिया टीम प्रसंगावधान राखत भूल देऊन अन्ननलिकेच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर जिथे वस्तू अडकली होती तिथून ती काढण्यास व्रण भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी डॅाक्टरांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एक्स-रे काढून खात्री करण्यात आली.
डॉ. कुरुप पुढे सांगतात की, या प्रक्रियेनंतर बाळाला इंटेन्सिव्ह पेडियाट्रिक केअर युनिट (IPCU) मध्ये ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी बाळाला रायल ट्युब(एक पातळ, मऊ नळी आहे जी नाकातून घशात व तिथून थेट पोटात जाते) च्या सहाय्याने आहार देण्यात आला. बाळाची प्रकृती चांगली होती आणि पुढील 5 दिवसांत त्याला घरी सोडण्यात आले. वेळीच उपचार आणि वाडिया हॉस्पिटलमध्ये उपलब्ध प्रगत पेडियाट्रिक एंडोस्कोपिक सुविधांची उपलब्धता यामुळे या बाळाला वाचविण्यात डॅाक्टरांना यश आले. सर्जिकल टीम, भूलतज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर टीमच्या यशस्वी प्रयत्नाने कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बाळाच्या अन्ननलिकेत अडकलेला धातूचा तीक्ष्ण तुकडा सुरक्षितरित्या बाहेर काढता आला.
आमच्या बाळाच्या शरीरात खोलवर एक तीक्ष्ण वस्तू अडकली आहे हे ऐकून सुरुवातीला आम्हाला धक्काच बसला. आम्ही घाबरुन गेलो होतो, असे काही कसे घडले असेल किंवा त्याचे परिणाम काय असतील हे आम्हाला माहित नव्हते. आमचे मूल अनेक दिवसांपासून हा त्रास सहन करत आहे या विचाराने आम्ही खुप घाबरलो होतो. वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत अचूकतेने हे प्रकरण हाताळले आणि आमच्या बाळाला यातुन सुरक्षितपणे बाहेर काढले. त्याला हळूहळू बरे होताना, पुन्हा जेवताना आणि हसताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. वाडिया हॉस्पिटलमधील संपुर्ण टीमचे आम्ही आभार मानतो अशी प्रतिक्रिया वडील रोहित यादव (नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केली.
वाडिया हॉस्पिटल हे बालरोग उपचारांमध्ये आघाडीवर असल्याचा अभिमान मला आहे. आमचे रुग्णालय प्रगत निदान आणि शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने यशस्वी उपचार शक्य आहे . या प्रकरणात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतून तीक्ष्ण धातूचा तुकडा शोधून तो यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला हे आमच्या सर्जिकल टीमचे मोठे यश आहे. कोणत्याही बाळाला निरोगी आयुष्य जगता यावे, प्रत्येक मूल रोगमुक्त रहावे हाच आमचा मुळ हेतू असल्याची प्रतिक्रिया बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केले.