मुख्य बातम्या

कामा रुग्णालयामध्ये युरोगायनॅकॉलॉजी अभ्यासक्रमासाठी मिळणार फेलोशिप

फेलोशीप देणारे कामा रुग्णालय ठरले पहिले सरकारी रुग्णालय

मुंबई :

महिलांचे गर्भाशय खाली येणे, मूत्रपिशवी खाली येणे, आपोआप लघवी होणे अशा महिलांमधील मूत्रविकारासंदर्भातीतल समस्यांवर सहज उपचार व्हावेत यासाठी कामा रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत विशेष मूत्ररोगशास्त्र विभागामार्फत आता युरोगायनॅकोलॉजी अभ्यासक्रमासंदर्भात डॉक्टरांना फेलोशिप सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उत्तम दर्जोचे उपचार मिळण्यास मदत होणार आहे. युरोगायनॅकोलॉजी अभ्यासक्रमामध्ये फेलोशीप देणारे कामा रुग्णालय महाराष्ट्रातले पहिले सरकारी रुग्णालय ठरणार आहे.

कामा रुग्णालयात मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड येथून मोठ्या प्रमाणात महिला उपचारासाठी येत असतात. या महिलांना अधिकाधिक व उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी सरकारकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येत असतात. कामा रुग्णालय हे जी.टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असल्याने आता या रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण ही सुरू झाले आहे. त्याचअनुषंगाने कामा रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या मूत्ररोगशास्त्र विभागामार्फत आता युरोगायनॅकोलॉजी अभ्यासक्रमाची फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला नुकतीच महाराष्ट्रा आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे. युरोगायनॅकोलॉजी अभ्यासक्रमाची फेलोशीप ही एक ते दोन वर्षांची असणार आहे. ही फेलोशीप या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळण्यास मद होणार असल्याचे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

कुशल डॉक्टरांची कमतरता दूर होणार
युरोगायनॅकोलॉजी अभ्यासक्रमासाठी फेलोशीप दिल्याने स्त्रीरोग आणि पेल्विक आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांना तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या क्षेत्रात तज्ज्ञ डाॅक्टर निर्माण करण्यास मदत होऊन युरोगायनॅकोलॉजीमधील कुशल डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे. या फेलोशीपमुळे मूत्ररोगशास्त्रातील संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

रुग्णालयात ३५०० महिलांवर होतात उपचार
कामा रुग्णालयामध्ये २०१९ मध्ये मूत्रविकारासंदर्भातील आजारांच्या उपचारांसाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला होता. या विभागाद्वारे दरवर्षी साधारणपणे ३५०० पेक्षा जास्त महिलांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच नुकतेच काही महिन्यांपूर्वी या विभागासाठी स्वंतत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला होता. आता युरोगायनॅकोलॉजी अभ्यासक्रमासाठी फेलोशिप सुरू करण्यात येणार असल्यामुळे त्याचा अधिक युरोगायनॅकॉलॉजिस्ट उपलब्ध होण्याबरोबरच महिलांना उत्तम उपचार मिळण्यास मदत होणार आाहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *