
मुंबई :
वैद्यकीय कौशल्य, संघभावना आणि जलद प्रतिसादाचे उत्तम उदाहरण ठरलेली एक विलक्षण शस्त्रक्रिया नुकतीच मुंबईतील जे.जे. रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. नसीर खान (नाव बदललेले), वय २५, या रुग्णाच्या उजव्या डोळ्यात १३ सेंमी लांब, २ सेंमी रुंद आणि ०.५ सेंमी जाड अशी धातूची वस्तू अपघातामुळे खोलवर घुसली होती. डोळा, मेंदू व आसपासच्या महत्त्वाच्या अवयवांसाठी ही वस्तू गंभीर धोका निर्माण करत होती.
तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी नसीर यांना जे.जे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. ऑन-कॉल डॉक्टरांनी त्वरेने प्राथमिक तपासणी करून नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी (कान-नाक-घसा), प्लास्टिक सर्जन आणि भूलतज्ज्ञ यांचा बहुविभागीय पथक तयार केले. सखोल तपासणीनंतर एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ही अतीव गुंतागुंतीची शस्त्रक्रिया प्राध्यापक डॉ. श्रीनिवास श्रीपात्राव चव्हाण (ईएनटी विभाग प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. डॉ. सुनीता बागे (सहाय्यक प्राध्यापक) यांनी ही प्रमुख शस्त्रक्रिया पार पाडली. डॉ. ऐश्वर्या (वरिष्ठ निवासी) आणि डॉ. रजी (कनिष्ठ निवासी-३) यांनी त्यांना सहाय्य केले.
कामा रुग्णालयामध्ये युरोगायनॅकॉलॉजी अभ्यासक्रमासाठी मिळणार फेलोशिप
भूलतज्ज्ञ डॉ. सुचित्रा आत्राम (सहयोगी प्राध्यापक) आणि डॉ. अनंतकृष्ण ए. (वरिष्ठ निवासी) यांनी रुग्णाची संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दक्षता घेतली. नेत्रविभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता चांदणे आणि डॉ. पुवाया यांच्या नेतृत्वाखालील स्टँडबाय टीम ने आवश्यक तांत्रिक सल्ला देत मदत केली. ऑपरेशन थिएटरमधील नर्सिंग स्टाफ, विशेषतः स्टाफ नर्स प्रेरणा वारेडंकर यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या अद्वितीय शस्त्रक्रियेचे यश वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सराफ यांनी कौतुकपूर्वक मान्य केले. त्यांनी रुग्णालयाच्या सेवाभावाची आणि तांत्रिक कौशल्याची प्रशंसा करत ही कामगिरी जे.जे. रुग्णालयाच्या १८० वर्षांच्या समृद्ध परंपरेला साजेशी असल्याचे सांगितले. रुग्ण सध्या उत्तम प्रकृतीत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली हळूहळू बरे होत आहेत. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरत असून, गुंतागुंतीच्या स्थितीतही संयम, ज्ञान आणि संघभावना कशी महत्त्वाची असते याचे प्रेरणादायक उदाहरण ठरली आहे.