
मुंबई
मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने मुंबई शहर व उपनगरातील रेल्वे स्थानक परिसरात नालेसफाईची कामे सुरू आहेत. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि योग्य पद्धतीने नालेसफाई व्हावी यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तसेच रेल्वेच्या कल्व्हर्ट खालील कचरा रोबोटच्या मदतीने साफ करण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सध्या नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. तसेच वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात दिरंगाई व हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाल्यातून बाहेर काढण्यात आलेला गाळ ४८ तासांच्या आत तातडीने उचलला जावा असेही निर्देश दिले.
भांडुप येथील उषानगर, उषा कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला वडाळा, दादर येथील धारावी टी जंक्शनजवळील नालेसफाईच्या कामाची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, माजी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगरात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई शहर व उपनगरात आतापर्यंत मोठ्या नाल्याची ८५ टक्के तर छोट्या नाल्यांची ६५ टक्के सफाई पूर्ण झाली आहे. पाऊस यंदा वेळेपूर्वीच सुरू झाला असल्याने तातडीने नालेसफाईचे काम करत पुढील १५ दिवसांमध्ये नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने नालेसफाई सुरू आहे. त्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्ट खालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. महापालिकेने दरवर्षी पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून ४२२ ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत. तर दोन ठिकाणी होल्डिंग पौंड आणि १० ठिकाणी छोटे पंपिंग स्टेशन कार्यान्वित केले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विक्रोळी येथील सूर्यानगर या दरड प्रवण क्षेत्राला भेट देऊन येथे महापालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले. दरवर्षी याठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. दादर येथील महापालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट देऊन बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका आणि येथे केलेल्या इतर कामांचाही त्यांनी आढावा घेतला.