
मुंबई :
राज्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस होत असताना मुंबईलाही सोमवारी पावसाने झोडपून काढले. यामध्ये मुंबईतील जे.जे. रुग्णालय व केईएम रुग्णलयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. रुग्णांना या पाण्यातून ये-जा करावी लागली.
मुंबईमध्ये सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असताना मुंबईतील जे.जे. रुग्णालयातही पाणी तुंबल्याची घटना घडली. जे.जे. रुग्णालयातील मुख्य इमारत आणि बाह्यरुग्ण विभाग यांच्यामध्ये असलेल्या परिसरामध्ये सोमवारी सकाळीच पाणी तुंबले होते. त्यामुळे सकाळच्या पाळीला कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्यातून जावे लागत होते. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना बाह्यकक्षामध्ये डॉक्टरकडे किंवा काही तपासण्या करण्यासाठी या पाण्यातून जावे लागत होते. त्याचवेळी ज्या रुग्णांना एमआरआय, सीटीस्कॅन काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. अशा रुग्णांना त्यासाठी तारीख घेण्यासाठी पाण्यामध्ये उभे राहावे लागत आहे. मागील काही वर्षांपासून जे.जे. रुग्णालयामध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
जे. जे. रुग्णालयाबाहेर रस्त्याच्या पातळीच्या तुलनेत रुग्णालयाची पातळी खाली आहे. तसेच जोरदार पाऊस पडल्यावर जे.जे. रुग्णालयातील पाणी वाहून नेणाऱ्या गटारे तुडुंब भरून वाहतात. परिणामी जे.जे. रुग्णालयातील पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होता. त्यामुळे जे.जे. पोलीस ठाणे परिसरात आणि जे.जे. रुग्णालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात तसेच रहिवासी इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. यामुळे कर्मचाऱ्यांना रुग्णालयामध्ये गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत होता.
केईएम रुग्णालय व टाटा रुग्णालयामध्ये असलेल्या रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी तुंबले आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात जाणाऱ्या रुग्णांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. त्याचबरोबर केईएम रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग व रुग्णकक्ष ४ अ या रुग्णकक्षांच्या वऱ्हांड्यामध्ये सकाळच्या सुमारास काही प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे या रुग्णकक्षामध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना काही काळ त्रासाला सामोरे जावे लागले.