
मुंबई :
मुंबई विद्यापीठ व त्याच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये अचानक करण्यात आलेली शुल्कवाढ ही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आर्थिक बोजा लादणारी आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत ही शुल्कवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी कुलगुरू व प्र-कुलगुरूंना ई-मेलद्वारे सविनय पत्र पाठवून केली आहे.
विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तक्रारीनुसार, अनेक महाविद्यालयांमध्ये आधीच निर्धारित शुल्काच्या तुलनेत अधिक रक्कम घेतली जात होती. आता अधिकृत शुल्कवाढ झाल्यानंतरही त्या बदल्यात विद्यार्थ्यांना ना पायाभूत सुविधा मिळत आहेत, ना गुणवत्तापूर्ण शिक्षण. ग्रंथालयांची दुरवस्था, प्रयोगशाळांचा अभाव, मोडकळीस आलेल्या इमारती, अपूर्ण संगणक सुविधा आणि मूलभूत सुविधांचा अभाव – ही विदारक स्थिती विद्यार्थ्यांना दररोज भोगावी लागते.
त्याचप्रमाणे, अनेक शिक्षक व प्राध्यापकांना आजही अल्पवेतनावर काम करावे लागत आहे. वाढीव शुल्क विद्यार्थ्यांवर लादले जात असताना शिक्षकांचे प्रश्न मात्र कायम आहेत. हे गंभीर असमतोलाचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. मातेले यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत, शुल्कवाढीबाबत विद्यापीठाने पारदर्शक माहिती जाहीर करावी.वाढीव शुल्कातून विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या सुविधा दिल्या जातील, याचे विवरण व्हावे. शिक्षक व प्राध्यापकांना वाढीव वेतन मिळणार का, याबाबत स्पष्टता द्यावी.महाविद्यालयीन प्रशासन शुल्काचा गैरवापर करत असल्यास त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी.विद्यार्थ्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शुल्कवाढीवर पुनर्विचार करावा.
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या संस्थांनी त्यांच्या गरजा, अडचणी आणि स्वप्नांची दखल घेतली पाहिजे. अन्यथा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावावर केवळ आर्थिक शोषण सुरू राहील, असा गंभीर इशारा यावेळी ॲड. मातेले यांनी दिला.