
मुंबई
बृहन्मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत आहे. महानगरपालिकेचे तब्बल ६ हजाराहून अधिक अधिकारी व कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मुंबई शहर व उपनगरात दिनांक २५ मे २०२५ रात्री १० ते दिनांक २६ मे २०२५ सकाळी ११ या १३ तासांत कालावधीत सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात शहर विभागात परिमन पॉईंट – २५२ मिलीमीटर, महानगरपालिका मुख्यालय – २१६ मिलीमीटर, ए विभाग – २१४ मिलीमीटर, कुलांबा पंपिंग स्टेशन – २०७ मिलीमीटर, नेत्र रूग्णालय ग्रॅट रोड – २०२ मिलीमीटर, सी विभाग कार्यालय – १८० मिलीमीटर, मेमनवाडा अग्निशमन केंद्र – १८३ मिलीमीटर, ब्रिटानीया पंपिंग स्टेशन (दादर) – १७१ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये कलेक्टर कॉलनी, चेंबुर – ८२ मिलीमीटर, कुर्ला विभाग – ७६ मिलीमीटर, मारवली महानगरपालिका शाळा चेंबुर – ७१ मिलीमीटर, कुर्ला अग्निशमन केंद्र – ६१ मिलीमीटर, एमसीएमसीआर, पवई – ६२ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात नारियलवाडी शाळा सांताक्रुझ – १०३ मिलीमीटर, सुपारी टॅंक – १०१ मिलीमीटर, वांद्रे अग्निशमन केंद्र – ९० मिलीमीटर, चकाला महानगरपालिका शाळा – ८५ मिलीमीटर, विलेपार्ले अग्निशमन केंद्र – ७५ मिलीमीटर आदींचा समावेश आहे.
सततच्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते. तथापि, या साचलेल्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा सज्ज होती. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रभाग अधिकारी (वॉर्ड ऑफिसर) आणि कर्मचा-यांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे. उप आयुक्तांनी याची खातरजमा करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा तात्काळ सतर्क झाली असून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. सर्व विभाग प्रमुख, अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथकांना प्रत्यक्ष मैदानात तैनात करण्यात आले आहे. तब्बल ६ हजार कर्मचारी ‘ऑन फिल्ड’ आहेत.
महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी तत्काळ नोंदवून संबंधित विभागांना पाठवण्यात येत आहेत. पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत.पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा, तरंगता घनकचरा मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी अथकपणे कार्यरत राहून सेवा बजावत आहेत. भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी पसरू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
संपूर्ण मुंबई महानगरात पाणी साचण्याच्या (Flooding spots) ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ४१७ उदंचन पंप व्यवस्था करण्यात आली आहे. हे उदंचन पंप कार्यरत राहावे, यासाठी पंप ऑपरेटर तैनात करण्यात आले होते. उदंचन पंप यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहिल्याने पाणी साचण्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचे आढळून आले. प्रमुख रस्ते, सखल भाग, उपनगरांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने निचऱ्याचे काम अद्याप देखील सुरू आहे. झाडांच्या फांद्या पडण्याच्या एकूण ३२ तक्रारी महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या. या फांद्याची छाटणी करून व तातडीने उचलून या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले आहे. एकूणच महानगरपालिका यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल कार्यरत असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे.
मुंबईकर नागरिकांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. केवळ अधिकृत माहिती स्रोतांचा वापर करावा. आवश्यकता भासल्यास १९१६ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.