
मुंबई
राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आढावा घेतला. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात मंत्री महाजन यांनी तातडीने भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. राज्यात मान्सून पूर्व पावसामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी यंत्रणा 24×7 सज्ज असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.
मंत्री महाजन म्हणाले, राज्यात प्रथमच मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत आवश्यक उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिक आयुक्तांना देण्यात आले आहेत. हवामान विभागाने राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा अलर्ट दिला आहे. मान्सून पूर्व पावसामुळे अचानक नदी, ओढ्याच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रस्ते मार्गही बंद होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पावसाळी पर्यटनासाठी धबधबे व अन्य ठिकाणी जातानाही नागरिकांनी दक्षता व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथके तैनात केली आहेत. बारामती फलटण येथे काल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पाठविण्यात आली होती, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.