
मुंबई
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आज (२७ मे संध्याकाळी ५ वाजता) पहिली गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयांद्वारे जाहीर केली जाणार आहे. ०८ मे २०२५ पासून सुरु केलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण २ लाख ५३ हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ११ हजार ६४३ एवढे अर्ज सादर केले आहेत. विद्यापीठाने निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार व प्रचलित नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांमार्फत राबवली जाणार आहे.
विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये बीकॉम १,५१,९०२, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) ५४,२३८, बीकॉम (अकाऊंट एँड फायनान्स) १,१३,३९२, बीए ८३,६३०, बीएस्सी आयटी ८६,९७६, बीएस्सी ३४,९८७, बीएस्सी कम्प्युटर सायन्स ६७,४२३, बीएएमएमसी २६,४१६, बीकॉम (बँकींग अँड इन्शूरंस) २२,२००, बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) २८,४२३, बीएस्सी (बायोटेक्नोलॉजी) २२,५७८, बीएस्सी (डेटा सायन्स) १५,२३०, बीएस्सी (डेटा सायन्स अँड एआय) ७१६३, बीएस्सी (एआय) ६,१२०, बीएस्सी (एआय अँड मशिन लर्निंग) ७,३५७, क्लाऊड टेक्नोलॉजी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी १,०६५ यासह विविध अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.
पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमीत केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.