शहर

ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई

माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती महोत्सव आज अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या विशेष प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री व मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले. महोत्सवाची सुरुवात विशेष पूजनाने झाली, त्यानंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्या पुरेचा आणि सरफोजी राजे भोसले संस्था यांच्या प्रस्तुतींनी रसिकांची मने जिंकली. श्री लक्ष्मी नारायण मंदिर आणि माधवबाग चॅरिटी यांच्या विश्वस्त मंडळातर्फे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी १५० वर्ष अविरत समाजसेवेचे कार्य केल्याबद्दल माधवबाग परिवाराचे अभिनंदन केले. जेव्हा ही संस्था २०० वर्ष पूर्ण करेल, तेव्हा येथे आपल्या मातृभाषेचे प्रशिक्षण केंद्र असावं, गीता, उपनिषदं आणि वेदांचं शिक्षण मिळावं आणि आरोग्य सेवा देखील मिळावी असे देखील त्यांनी सुचवले. प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक वर्ष प्रलंबित ऐतिहासिक निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आले. मोदींच्या कार्यकाळात भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. २०४७ साली आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू हा विश्वास आहे. हा बदललेला भारत आहे, जो आमच्या माता भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना, त्यांच्या घरात घुसून मारतो. आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व समजले. ऑपरेशन सिंदूरमुळे आपल्या माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेला आज १५० वर्ष पूर्ण झाली हा अतिशय महत्वपूर्ण क्षण आहे. या क्षणाला गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मला येथे दर्शनासाठी येण्याची संधी मिळाली याचा अत्यंत आनंद आहे. या वास्तूमध्ये फक्त देवाची मूर्ती नसून, येथे त्याचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे. त्यामुळेच येथे अखंडित सेवाकार्य सुरु आहे. माधवबागच्या माध्यमातून गोसेवा, समाजसेवा यासह अन्य प्रकारच्या मदत कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेण्यात आला आहे. याद्वारे समाजसेवेसाठी ज्यांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यांना मी नमन करतो आणि माधवबाग परिवाराला शुभेच्छा देतो.”

श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंतीचा हा महोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता, श्रद्धा, समाजसेवा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा प्रतीक ठरला. मुंबईच्या हृदयस्थानी असलेले हे श्रद्धास्थान पुढील पिढ्यांपर्यंत आपली परंपरा आणि आध्यात्मिक प्रेरणा जपत राहील, असा विश्वास यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *