
मुंबई
दुचाकीवरुन प्रवास करत असताना अचानक झालेल्या अपघातात पुढे उभ्या असलेल्या ३ वर्षाच्या मुलीच्या कवटीला गंभीर दुखापत झाली. अशा परिस्थितीत प्रसंगावधान राखत न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली टिमने या तीन वर्षीय अरिबा खुरेशीवर गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत तिला नवे आयुष्य मिळवून दिले.
न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी, प्लास्टिक सर्जन डॉ. दीपेश मालवीय, नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. शिवकुमार आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संजीव आहुजा यांच्यासह टिमने या चिमुरडीवर यशस्वी उपचार केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि वेळीच केलेल्या उपचारांमुळे तिचा जीव वाचविता आला आणि आता ती बरी होत आहे.
अचानक झालेल्या अपघाताने दुचाकी वाहनावर(स्कुटीवर) समोर उभ्या असलेल्या या चिमुरडीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली, ज्यामुळे तिच्या कवटीचे तुकडे झाले आणि डोक्याच्या हाडाला गंभीररित्या मार बसला. चालकाला किरकोळ दुखापत झाली, तर मुलीला दुचाकीवरुन पडल्यामुळे मार लागला व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या चिमुरडीच्या कवटीला मार बसून ती काही भागात विभागली गेली आणि मेंदूच्या काही ऊती बाहेर पडल्या होत्या. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतच पवईतील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयात हलविण्यात आले.
पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी यांनी या प्रकरणाविषयी आणि या स्थितीतचे वर्ण करताना “तुटलेल्या अंड्याच्या कवचाला एकत्र जोडणे” असे हे प्रकरण असल्याचे स्पष्ट केले. रुग्णाला त्वरीत शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, म्हणून डॉ. अन्सारी यांनी प्लास्टिक सर्जन डॉ. दीपेश मालवीय यांच्या सहकार्याने तिची कवटी पुन्हा बांधली ती दुरुस्ती केली. तिच्या कवटीत निर्माण झालेले अंतर भरण्यासाठी, त्यांनी मुलीच्या शरीरातील ऊतींचा वापर केला.
शस्त्रक्रियेनंतर या मुलीच्या तिच्या पुनर्प्राप्तीसाठी विशेष निरीक्षणाखाली ठेवण्याची आवश्यकता होती. नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. शिवकुमार आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संजीव अहुजा यांनी तिच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण केले आणि तिला वेळोवेळी आधार दिला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठ दिवसातच तिच्यात सुधारणा दिसून आली. तिने स्वतःहून डोळे उघडले, श्वास घेतला. त्यानंतर तिची प्रकृती स्थिरावल्यावर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉ. खुर्शीद अन्सारी सांगतात की, या घटनेने हे सिद्ध होते की आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक असले पाहिजे आणि लहान मुलांना कधीही असुरक्षित ठिकाणी बसवून प्रवास करु नये.
पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. समीर कुलकर्णी यांनी संपुर्ण टीमचे कौतुक केले. त्यांनी रस्ता सुरक्षिततेवर भर देत म्हटले की, पालकांनी त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.
एक क्षण असा आला जेव्हा मला वाटले की मी तिला कायमचे गमावले आहे. तिला पुन्हा डोळे उघडून पाहताना आणि हसताना मला खुप आनंद झाला. डॉक्टरांनी जे केले ते मी कधीही विसरणार नाही. त्यांनी फक्त माझ्या मुलीला वाचवले नाही तर त्यांनी आमच्या कुटुंबाला या दुःखातून बाहेर काढले अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडीलांनी व्यक्त केली.