
मुंबई
तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उतीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठीचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी २८ मेपासून सुरुवात होत आहे. राज्यातील चार विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांतर्गत पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी प्रत्येक कृषी महाविद्यालयातील जागांच्या १० टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग सोपा होणार आहे. या प्रवेशसाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान ६.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह उत्तीर्ण व आरक्षित प्रवर्गासाठी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह (सीजीपीए) उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची माहिती सीईटी कक्षाचे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.
प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २८ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ११ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी २० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर होणार आहे. पहिली फेरी २४ ते २६ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ९ जुलै असणार असल्याची माहिती सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
प्रवेश प्रक्रियेला सुरूवात – २८ मे (सकाळी ९.०० पासून)
ऑनलाईन प्रवेश अर्ज व कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे – ११ जूनपर्यंत
अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर १५ जून (सायंकाळी ५.३० नंतर)
ऑनलाईन तक्रार नोंदणी – १६ ते ते १८ जून
तक्रार यादी प्रसिद्ध – १९ जून (सायंकाळी ५.३० नंतर)
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर – २० जून (सायंकाळी ५.३० नंतर)
पहिल्या प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांची प्रसिध्दी – २० जून
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे २० ते २१ जून
पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादी जाहीर २३ जून (सायंकाळी ५.३० नंतर)
रिपोर्टिंगचा कालावधी – २४ ते २६ जून (सकाळी ९ ते सायंकाळी ६)
दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा जाहीर – २७ जून (सकाळी ९ वाजता)
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे – २७ व २८ जून
दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादी जाहीर ३० जून (सायंकाळी ५.३० नंतर)
रिपोर्टिंगचा कालावधी – १ ते ३ जुलै (सकाळी ९ ते सायंकाळी ६)
प्रवेशित जागांचा तपशील जाहीर – ४ जुलै (सायंकाळी ५.३० नंतर)
रिक्त जागांकरिता ‘केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी – ६ व ७ जुलै
महाविद्यालयस्तरीय प्रवेश फेरी – ८ व ९ जुलै
प्रवेश प्रक्रियेसाठीचा अंतिम दिनांक – ९ जुलै