
मुंबई
राज्यात दिवसेंदिवसस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या नव्या विषाणू वेगाने पसरत असल्याने राज्य सरकारकडून रुग्णालये आणि त्यांच्या सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययाेजना सुरू केल्या आहेत. त्या धर्तीवर मुंबईतील कामा रुग्णालयाने कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी ३० खाटांचे कक्ष सज्ज ठेवले आहे.
कामा रुग्णालय हे महिलांसाठी आणि बालकांसाठी समर्पित असलेले राज्यातील एकमेव रुग्णालय आहे. सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, कामा रुग्णालयाने पुन्हा एकदा स्त्रिया आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मागील लाटेत दाखविलेल्या तत्परतेप्रमाणेच, यावेळीही रुग्णालय प्रशासनाने करोना बाधित स्त्रिया व बालकांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था केली आहे.
रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने सुरू करण्यात आलेल्या या कक्षात एकूण ३० खाटा उपलब्ध करण्यात आल्या असून, त्यात १० खाटा बालकांसाठी आणि २० खाटा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कक्षात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, निगराणी प्रणाली आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विभागात अनुभवी आणि प्रशिक्षित महिला डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामुळे स्त्रिया व बालकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
कामा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, “कोविडची लाट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. या पार्श्वभूमीवर, स्त्रिया आणि बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मागील अनुभवावरून आम्हाला हे लक्षात आले की, स्वतंत्र कक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही ही व्यवस्था वेळीच उभारली आहे. तसेच त्यांनी सतर्कता आणि काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. कोविडशी लढण्यासाठी अशा प्रकारच्या सकारात्मक आणि नियोजनबद्ध उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.