शिक्षण

आयटीआयची पहिली यादी ९ जुलै रोजी होणार जाहीर

२६ जून पर्यंत प्रवेशअर्ज भरता येणार

मुंबई :

कौशल्य शिक्षण देणाऱ्या राज्यातील आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत अर्ज करता येणर असून, प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ९ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये १ हजार ७ आयटीआय संस्था असून, त्यामध्ये शासकीय ४१९ तर खासगी ५८८ संस्था आहेत. आयटीआयच्या विविध अभ्यासाक्रमांसाठी १५ मे पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरले आहेत. नोंदणी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. त्याचप्रमाणे ६८ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासाक्रमांचे पसंतीक्रम भरले आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून सुरूवातील फक्त नाेंदणी वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र आता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. हरकती नोंदविल्यानंतर संचालनालयाकडून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. यांनतर ९ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार फेऱ्या आणि त्यानंतर संस्थास्तरावर समुपदेशन प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहेत.

असे असेल वेळापत्रक
ऑनलाईन अर्जासाठी मुदत – २६ जून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
प्रवेश अर्ज निश्चित करणे – २७ जून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
पहिल्या फेरीसाठी प्राधान्य सादर करणे – २७ जून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी – ३० जून, सकाळी ११ वाजता
गुणवत्ता यादीवरील हरकती नोंदविणे – १ जुलै, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ३ जुलै, सायंकाळी ५ वाजता
पहिली यादी – ९ जुलै, सायंकाळी ५ वाजता
प्रत्यक्षात संस्थांमध्ये प्रवेश – १० ते १५ जुलै, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
दुसरी प्रवेश फेरी – २३ ते २८ जुलैदरम्यान
तिसरी प्रवेश फेरी – २८ जुलैपासून
चौथी प्रवेश फेरी – ४ ते ८ ऑगस्टदरम्यान
संस्था स्तरावर समुपदेश फेरी – २१ ऑगस्ट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *