
मुंबई :
जे. जे. रुग्णालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिकत असलेल्या रोहन प्रजापती (२२) या विद्यार्थ्याने रविवारी वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. विद्यार्थ्यांची नुकतीच परीक्षा झाल्याने वसतिगृहामध्ये कोणीही नसल्याचे पाहून त्याने आत्महत्या केली. तसेच ही आत्महत्या त्याने कौटुंबिक कारणातून केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
घाटकोपर येथील रोहन प्रजापती हा जे.जे. रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तो रुग्णालयाच्या आवारातील अपना बॉईज या वसतिगृहातील खोली क्रमांक १९८ मध्ये चार सहकाऱ्यांसोबत राहत होता. नुकत्याच परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांना सुट्ट्या पडल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे आपल्या घरी गेले आहेत. रविववारी रात्री रोहन प्रजपती याने रुग्णालयातील आपल्या सहकाऱ्याला दूरध्वनीद्वारे वसतिगृहाच्या त्यांच्या खोलीमध्ये कोणी आहे का याबबत विचारणा केली. त्यावेळी त्याने तो बाहेर असून, खोलीमध्ये कोणीही नसल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास अपना रोहन बॉईज या वसतिगृहातील खोली क्रमांक १९८ मध्ये आला. त्याने खोलीचे दार आतून बंद केले. त्यानंतर नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास लावून घेतला. काही वेळाने त्याचे मित्र खोलीवर आल्यावर वारंवार दरवाजा ठोठावूनही रोहन दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिल्यावर रोहनने आत्महत्या केल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने दरवाजा उघडत रोहनला सीपीआर देऊन आपत्कालीन विभागामध्ये नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रोहनचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियाकडे सोपविण्यात आला. रोहनने हा नीट यूजी परीक्षेमध्ये भारतात ३१५५ रँक मिळवला होता. तो अभ्यासात हुशार होता. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाणे अधिक तपास करत असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. दरम्यान ही आत्महत्या कौटुबिक कारणातून करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.