शिक्षण

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनाही आता लाखो रुपये मासिक वेतन

मुंबई :

पॉलिटेक्निकमधून विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता लाखो रुपयांचे पॅकेज मिळू लागले आहेत. तंत्रशिक्षण विभागातंर्गत पॉलिटेक्निक संस्थांमध्ये नुकत्याच झालेल्या प्लेसमेंटमध्ये नागपूरमधील सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना तब्बल १२.७४ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या पॅकेजपैकी आतापर्यंतचे हे सर्वाधिक पॅकेज आहे.

तंत्रशिक्षण विभागातंर्गत असलेल्या सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये दरवर्षी प्लेसमेंट प्रक्रिया राबविण्यात येते. या प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना साधारणपणे दोन ते तीन लाखांचे वार्षिक पॅकेज मिळत असे. म्हणजेच या विद्यार्थ्यांना साधारणपणे १५ ते २५ हजार रुपये महिन्याला वेतन मिळत असे. मात्र यंदा प्रथमच नागपूर सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये तीन विद्यार्थ्यांना महिन्याला एक लाख सहा हजार रुपये म्हणजेच वार्षिक १२.७५ लाखांचे पॅकेज कंपनीकडून देण्यात आले आहे. नागपूर सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयातून हे तिन्ही विद्यार्थ्यांनी मॅकेनिकल इंजिनियरिंग या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची अद्याप अंतिम वर्षाची परीक्षा झालेली नसतानाही त्यांना मिळालेल्या लाखो रुपयांच्या पॅकेजमुळे आता पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाखो रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते हे स्पष्ट झाले आहे.

नागपूर सरकारी पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या प्लेसमेंटमध्ये ऑटोलिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व महिंद्रा असेलो ॲण्ड सुपा या कंपन्यांनी एकत्रितरित्या १२९ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्याखालोखाल कॅरेरो इंडिया लिमिटेडने ८८ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. तसेच महिंद्रा व कॅरेरो इंडिया या कंपनीने एकत्रितरित्या ७३ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. तर टाटा मोटर्स आणि आरडीसीने प्रत्येकी एका विद्यार्थ्याला नोकरी दिली. व्होल्टास या कंपनीने फक्त तीन विद्यार्थ्यांना नोकरी दिली मात्र या तिन्ही विद्यार्थ्यांना १२.७५ लाखांचे वार्षिक पॅकेज दिले.

२३ कंपन्यांनी दिल्या ५८२ विद्यार्थ्यांना नोकऱ्या

नागपूर सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयात झालेल्या प्लेसमेंटमध्ये आदित्य बिर्ला, व्होल्टास, टाटा मोटर्स, एल ॲण्ड टी कन्स्ट्रक्शन ॲण्ड मायनिंग मशिनरी, महिंद्रा, टाया ॲडव्हान्स सिस्टिम लिमिटेड, डिक्सन इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या २३ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या २३ कंपन्यांनी ५८२ विद्यार्थ्यांना नाेकऱ्या दिल्या आहेत.

पॉलिटेक्निकच्या तीन विद्यार्थ्यांना महिन्याला एक लाख रुपये वेतन मिळणे ही आनंदाची बाब आहे. पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला लाखो रुपये वेतन मिळावे यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न सुरू आहेत.

– डाॅ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण विभाग

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *