मनोरंजन

मराठी नाट्य निर्मात्यांच्या रास्त मागण्यापूर्तीसाठी प्रयत्नशील – आशिष शेलार

मुंबई : 

मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या मराठी नाट्यसृष्टी पुढील समस्या दूर करणे, व्यवहार्य मागण्यांची पूर्तता करणे; हे शासन म्हणून आमचे कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवून आपल्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करीत आहोत, अशी खात्री राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिषजी शेलार यांनी “मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा”च्या पदाधिकाऱ्यांना दिली.

“मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ” ही मराठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांची नोंदणीकृत (स्थापना १९६९) संस्था आहे. या संस्थेच्या मागण्यांवर चर्चा – निर्णयासाठी सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी ९ मे रोजी “पु.ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी” येथील समिती कक्षामध्ये विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला “मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ”चे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे व सहकार्यवाह श्रीकांत तटकरे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, “पु.ल. देशपांडे कला अकादमी” संचालक मीनल जोगळेकर आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत नाट्य निर्माता संघ पदाधिकाऱ्यांनी सर्व नाट्य निर्मात्यांच्या नाटकाचे नेपथ्य (सेट) व अन्य सामान एकाच जागी ठेवण्यास गोडाऊनसाठी जागा मिळावी ; नाटकाच्या सामानाची व रंगकर्मीची वाहतूक करणाऱ्या बस व या टेम्पोच्या पार्किंगसाठी गोडाऊन जवळच जागा मिळावी ; नवीन नाटक निर्मितीसाठी मिळणाऱ्या अनुदानात भरघोस वाढ व नियमावलीत बदल व्हावा ; नाट्य निर्मात्यांना निवासासाठी सवलतीच्या दरात सिडकोच्या सदनिका उपलब्ध करून द्याव्यात; ह्या प्रमुख मागण्या नाट्य निर्माता संघातर्फे बैठकीत सादर करण्यात आल्या.

या मागण्यांमागील अडचणी मंत्री आशिषजी शेलार, मुख्य सचिव विकास खारगे व सहसंचालक पांडे यांनी समजून घेतल्या. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यावर “मागण्या रास्त असल्याने त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी कार्यवाही व्हावी, अशा सूचना उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना मंत्री आशिषजी शेलार यांनी दिल्या. “मराठी नाट्य व्यवसाय सशक्त राहावा, शासनाच्या मदतीची निर्मात्यांना गरज राहू नये, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, यासाठी आमचे शासन प्रयत्नशील आहे,” असेही ते म्हणाले.

“ह्या मागण्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करू,” असे सांगून “मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा”चे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे म्हणाले, “आमच्या मागण्यांकडे मंत्री महोदयांनी आपुलकीने पाहिले. आमच्या समस्या तपशिलासह समजून घेतल्या. त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे सांगितले. ह्या गोष्टी नाट्य निर्मात्यांना आणखी चांगल्या नाट्यकृती रंगमंचावर आणण्यासाठी बळ देणाऱ्या आहेत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *