
मुंबई :
संचमान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन तातडीने सुरू करावे अशी मागणी अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली असून शिक्षण उपसंचालकांनी अनिल बोरनारे यांची मागणी राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवले असून याबाबत प्रधान सचिव कोणता निर्णय घेतात? याकडे मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन व्हावे व त्यांचे बंद झालेले वेतन तातडीने सुरू करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीत मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबई महानगरपालिकेतील शाळांमध्ये करण्यात यावे तसेच मागील महिन्यापासून शिक्षकांचे बंद केलेले वेतन तातडीने सुरू करावे असा आग्रह धरला. त्यांना निवेदन दिले या निवेदनावर शिक्षण उपसंचालकांनी कार्यवाही करून राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे उचित कार्यवाहीसाठी बोरनारे यांचे निवेदन पाठवले आहे.
हेही वाचा : तर पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव नव्हे शाळा राहणार बंद
संचमान्यतेमध्ये मुंबईतील शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरले असून त्यांचे समायोजन ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात करण्यात आले होते. या समायोजनाला शिक्षकांनी विरोध दर्शवला होता. मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त असून या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यास मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटू शकतो, तसेच मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या शाळांमध्ये खाजगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होऊ शकते असा दावाही अनिल बोरनारे यांनी केला आहे.