
मुंबई :
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा ही दिनांक १५ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात येते. यंदाची ४० वी एमएच-सेट परीक्षा असून ती विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई विद्यापीठाच्या समन्वयाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध २५ महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ८४८ एवढे परीक्षार्थी आहेत. या परीक्षेसाठीची प्रवेश पत्रे विद्यार्थ्यांना ५ जून पासून अधिकृत संकेतस्थळावरून https://setexam.unipune.ac.in. डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या परीक्षेच्या यशस्वी नियोजनासाठी मुंबई शहर केंद्र प्रमुख म्हणून दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील एकूण २५ महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले असून सर्व केंद्र प्रमुखांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे प्रा. शिवाजी सरगर यांनी सांगितले. परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी प्रवेशपत्राचा प्रिंट आऊट व मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.