शिक्षण

बीए, बीएससी बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटी अर्ज नोंदणीला मुदतवाढ

मुंबई :

राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेने (एनसीटीई) चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम २०२५-२६ ऐवजी २०२६-२७ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) २ ते १५ जून या कालावधीत या अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र नोंदणी केलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना शुल्क भरून अर्ज निश्चित करण्याबरोबरच अर्ज नोंदणी करण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेने चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम २०२६-२७ पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना सीईटी कक्षाला दिल्या होत्या. त्यानुसार २ ते १५ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र त्यातील फक्त ३९५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला तर अद्यापपर्यंत ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सीईटी कक्षाने नोंदणी प्रक्रियेची मुदत २३ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा ही सीईटी कक्षाने २० जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना नोंदणी अर्जाबाबत किंवा प्रक्रियेबाबत काही शंका अथवा समस्या आल्यास त्यांनी तातडीने सीईटी कक्षातर्फे दिलेल्या cethelpdesk@maharashtracet.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना २३ जूननंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही सीईटी कक्षाने स्पष्ट केले.

सीईटी कक्षाकडून राबविण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान जवळपास ९०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या या विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्क त्यांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेकडून ‘आयटीईपी’ या अभ्यासक्रमाची केंद्रीय स्तरावर प्रवेश प्रक्रिया कधी राबविण्यात येत आहे याची विद्यार्थी वाट पाहत होते. मात्र आता जवळपास अडीच महिन्यांनंतर राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदे चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम २०२५-२६ ऐवजी २०२६-२७ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी कक्षाला देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *