शिक्षण

पनवेलमधील सेंट विल्फ्रेड शाळेविरोधात मनसेचा लढा

पनवेल, शेडूंग :

मागील ८ महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेलचे पदाधिकारी आणि संबंधित पालक सेंट विल्फ्रेड शाळा, शेडूंग, पनवेल विरोधात सातत्याने लढा देत आहेत. शिक्षण विभागाकडून केल्या गेलेल्या चौकशी अहवाला नुसार पालकांच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यावरसुद्धा, आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाल्याचे स्पष्ट असूनही अद्याप शाळेविरोधात ठोस कारवाई झालेली नव्हती.

१८ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, अलिबाग येथे सुनावणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र संबंधित शाळेचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी महारुद्र नाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी मनसेच्या मागण्यांना दुजोरा देत शाळेविरोधात कारवाईचे ठोस आश्वासन दिले. चुकीच्या पद्धतीने घेतलेली ‘लेट फी’ परत करण्याचे आदेश सेंट विल्फ्रेड शाळेला देण्यात यावेत, आणि वाढवलेली फी मागील वर्षाच्या प्रमाणात कमी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी जोरदार मागणी मनसेने केली. नाळे साहेबांनी दोन्ही गोष्टी बेकायदेशीर असल्याचे मान्य करत शाळेला लवकरच नोटीस दिली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणल्याचेही पुरावे मिळाल्याने शाळेविरोधात लवकरच कठोर कारवाई होईल. यापुढे असा प्रकार पुन्हा घडल्यास सेंट विल्फ्रेड शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभाग सादर करेल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणात सीताराम मोहिते, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग पंचायत समिती, पनवेल यांच्याकडून वेळेवर योग्य कारवाई झाली नाही तसेच प्रकरण लांबवण्यात आले, आणि शाळेची पाठराखण झाल्याच्या तक्रारी पालकांनी व मनसेने केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील चौकशी करून नोटीस बजावण्यात येईल, असे नाळे साहेबांनी स्पष्ट केले.

मनसे पनवेलचे ठाम मत आहे की, जर योग्य न्याय मिळाला नाही, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. गरज पडल्यास शाळेचा दरवाजा बंद होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. शाळेतील एकही काच शाबूत राहणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभागावर असेल. मात्र महारुद्र नाळे यांनी वेळेवर आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे ठाम आश्वासन देत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *