शिक्षण

Engineering : अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

मुंबई :

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेले प्रवेश प्रक्रियेच्या नियमांतील बदल आता ऑनलाइन पोर्टलवर टाकल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी आणि एमबीए या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आज, शनिवारपासून सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरील आपल्या लॉग-इनमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर या दोन्ही अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी जाहीर होईल. त्यावर हरकती आणि सूचना आल्यानंतर १७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

सीईटी कक्षाने यंदा अभियांत्रिकी आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्यातच घेतली होती. एमबीएसाठीची सीईटी १ ते ३ एप्रिल या दिवशी सहा सत्रांमध्ये झाली. एमबीए सीईटीसाठी राज्यभरातून विक्रमी १,५७,२८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १,२९,१३१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर अभियांत्रिकीसाठीची सीईटी ९ ते १७ एप्रिल या कालावधीत चार लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी दिली. एमबीए सीईटीचे निकाल २८ मे आणि अभियांत्रिकी सीईटीचे निकाल १६ जून रोजी जाहीर झाले.

त्यानंतर आता सीईटी कक्षातर्फे शुक्रवारी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे तपशील जाहीर करण्यात आले. या तपशीलांनुसार दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी शनिवार, २८ जूनपासून सुरू होणार आहे. ही नोंदणी ८ जुलैपर्यंत सुरू असेल. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी १२०० रुपये शुल्क असेल, तर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येईल.

३० जून ते ९ जुलै या काळात कागदपत्रांची आणि अर्जांची पडताळणीही होणार आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी दोन्ही अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर या गुणवत्ता यादीवर हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी १३ ते १५ जुलैची मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम व अभ्यासक्रमांची पसंती भरण्यासाठी वेळ दिला जाईल. त्याचे व पुढील कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून नंतर जाहीर केले जाणार आहे.

असे असेल वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्ज नोंदणी – २८ जून ते ०८ जुलै
  • कागदपत्रे पडताळणी – ३० जून ते ०९ जुलै
  • तात्पुरती गुणवत्ता यादी – १२ जुलै
  • हरकती व आक्षेप नोंदणी – १३ ते १५ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी – १७ जुलै

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *