
मुंबई :
अभियांत्रिकी व एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) एम टेक, एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी १३ जुलै तर अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
सीईटी कक्षाकडून एम. टेक, एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करण्याबरोबरच कागदपत्रे स्कॅन करणे आणि अपलोड करता येणार आहे. त्यानंतर २ ते १० जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्रे ऑनलाईन पडताळणी किंवा प्रत्यक्ष पडताळणी करता येणार आहे. तसेच ९ जुलैनंतर अर्ज नाेंदणी करणाऱ्या किंवा १० जुलैनंतर कागदपत्रांची पडताळणी करणारे विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. हे विद्यार्थी संस्थास्तरावरील फेऱ्यांसाठी पात्र ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची १३ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादीवर १४ ते १६ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर १८ जुलै रोजी या एम. टेक, एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम व अभ्यासक्रमांची पसंती भरण्यासाठी वेळ दिला जाईल. त्याचे व पुढील कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
अर्ज नोंदणीसाठी १२०० रुपये नोंदणी शुल्क
एमसीए व एम.ई / एम.टेक या अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १२०० रुपये शुल्क आकाण्यात आले आहे, तर अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. तसेच हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये शुल्क, तर अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज नोंदणी – ९ जुलैपर्यंत
- कागदपत्रे पडताळणी – १० जुलैपर्यंत
- तात्पुरती गुणवत्ता यादी – १३ जुलै
- हरकती व आक्षेप नोंदणी – १४ ते १६ जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी – १८ जुलै