
मुंबई :
राज्यामध्ये तिसऱ्या भाषेला सर्वच स्तरातून झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने तिसऱ्या भाषेचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) नव्याने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकातून हिंदी विषय हद्दपार करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये फक्त दोनच भाषा शिकवल्या जाणार असून, तिसऱ्या भाषेची सक्ती असणार नाही.
शालेय शिक्षण विभागाने १७ जून रोजी रात्री उशिरा हिंदी ही सर्वसाधारण भाषा असून इयत्ता पहिलीपासून तून भाषा शिकवल्या जातील, असा शासन निर्णय जाहीर केला. त्यानंतर दोनच दिवसांत एससीईआरटीने तिसऱ्या भाषेसह वेळापत्रकही जाहीर केले. या वेळापत्रकात मुलांसाठी शिक्षण ‘आनंददायी’ करणाऱ्या कला आणि क्रीडा तासिकांचा वेळ कमी करण्यात आला होता. तिसऱ्या भाषेच्या सक्तीवरून राजकीय रान उठल्यानंतर होणारा विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या भाषेसंदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द करत या विषयी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
अतिरिक्त समृद्धीकरणासाठी तीन तासिका राखीव
विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनाची आवश्यकत आहे. यासाठी एकाच सत्रात भरणाऱ्या शाळांना वेळापत्रकात आठवड्यातील ३ तासिका ‘अतिरिक्त समृद्धीकरण तासिका’ म्हणून राखीव ठेवता येणार आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे ठरविण्याचे अधिकार शाळेला दिले आहेत. तसेच दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण तासिकांसाठी वेळ देण्यात आला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त किंवा विद्यार्थी विभागणी करून, ‘अतिरिक्त समृद्धीकरण तासिका’साठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही एसईआरटीने दिल्या आहेत.
अशी असेल विषयनिहाय तासिकांची विभागणी
विषय—साप्ताहिक तासिका—तासिकेचा कालावधी
ग्रंथालय—१—३५ मिनिटे
पहिली भाषा—१६—३५ मिनिटे
दुसरी भाषा —९—३५ मिनिटे
गणित—१०—३५ मिनिटे
कलाशिक्षण—६—३५ मिनिटे
आरोग्य व शारीरिक शिक्षण—३—३५ मिनिटे
कार्यशिक्षण—३—३५ मिनिटे