
मुंबई :
महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे सध्या १४ हजार ५०० बसेस असून त्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात महामंडळ मालकीच्या २५ हजार बसेस खरेदी करण्यात येतील. यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. त्याचबरोबर, महामंडळाकडे असलेले ८४० बसडेपो हे बसपोर्ट मध्ये रुपांतरित केले जातील. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून पुढील दोन वर्षात ‘एसटी’चा चेहरामोहरा बदलेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत सांगितले.
‘एसटी’ महामंडळाचे आधुनिकीकरण करताना बसेस, डेपो स्वच्छता आणि प्रवाशांसाठी सुविधांकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. प्रत्येक डेपोमध्ये ई-टॉयलेट, ड्रायव्हर तसेच कंडक्टरसाठी युनिफॉर्म धुण्याची आणि गरम पाण्याची सोय अशा विविध सुविधा देण्यात येतील, असे सांगून मंत्री सरनाईक म्हणाले की यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आणि स्पर्धात्मक असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
गुजरातच्या ‘बस पोर्ट’ संकल्पनेचा दाखला देत, महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात एसटीचा समांतर विकास होईल. एसटी महामंडळ सध्या डिझेलसाठी ३३ हजार कोटी रुपये वर्षाला खर्च करत असल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘सीएसआर’च्या माध्यमातून सर्व बस डेपोमधून ई-टॉयलेट सुविधा तसेच प्रसाधन गृहांच्या सुविधा दिली जाईल, असे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
विधान परिषद सदस्य ॲड.अनिल परब, शशिकांत शिंदे, सदाभाऊ खोत आदी सदस्यांनी अर्धा तास चर्चेच्या सूचनेद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन संदर्भात चर्चा उपस्थित केली. त्यास सरनाईक यांनी उत्तर दिले.