
मुंबई :
राज्यातील वाढती शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्या विचारात घेता संबंधित संस्था व त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक स्वरूपाची व नाविन्यपूर्व शिक्षण पद्धती उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यामध्ये गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या १० वैद्यकीय महाविद्यालयांसह १२ महाविद्यालयांमध्ये ई – डिजिटल ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आशियाई विकास बँकेकडून मिळणाऱ्या योजना आधारित कर्जाच्या मंजूर अनुदानातून ४७ कोटी १२ लाख ४२ इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील बरीचशी पाठ्यपुस्तके, जनरर्लस, मॅगजीन, शोधनिबंध, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित साहित्य यांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये साहित्य संपदा उपलब्ध करून देण्यास सरकारला अडचणी येत आहेत. तसेच महाविद्यालयांमध्ये उपलब्ध मुद्रित पुस्तकांची संख्या कमी असल्याने पुस्तके एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना वापरता येत नाहीत. विद्यार्थ्यांच्या वारंवार वापरामुळे पुस्तके लवकर खराब होण्याचे प्रमाणही जास्त आहे. ही बाब लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या १२ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ई – डिजिटल ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या १० वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. ई – डिजिटल ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून २०२५-२६ या वित्तीय वर्षात आशियाई विकास बँकेकडून मिळणाऱ्या कर्जातून ४७ कोटी १२ लाख ४२ हजार २३२ रुपये इतक्या निधीची तरतूद केली आहे. १२ वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात येणारी हे ई डिजिटल ग्रंथालय पुढील सहा महिन्यांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे.
जागतिक दर्जाचे शैक्षणिक साहित्य होणार उपलब्ध
ई-डिजीटल ग्रंथालयमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची अद्ययावत वैद्यकीय शैक्षणिक साहित्य सहजरित्या मोबाईल व टॅबवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत भर पडणार आहे. तसेच ही पुस्तके व शैक्षणिक साहित्य याची अद्ययावत सुधारित आवृत्ती आपोआप विद्यार्थी व प्राध्यापकांना उपलब्ध होणार आहे. नॅक, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग या सारख्या नियामक संस्थांसाठी देखील ई-लायब्ररीची आवश्यकता आहे.
कोणत्या महाविद्यालयात सुरू होणार ग्रंथालय
रत्नागिरी, भंडारा, बुलढाणा, वाशिम, मुंबई, अंबरनाथ, अमरावती, जालना, हिंगोली, नाशिक आणि अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे ई डिजिटल ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे.