
संदिप साळवे
पालघर:
जव्हार संस्थानातील नागरिकांना आध्यात्मकेतची पूर्वापार हौस, सध्या आषाढी एकादशी निमित्त लाडक्या विठुरायाच्या भेटीची आतुरता आणि वारी म्हणजे भेटी लगे जिवा असे बोलले जाते, आणि हाच अनुभव पुन्ह्यांदा अनुभवण्यासाठी जव्हारचे चुंबळे दांपत्य यंदा चौथ्या वारीला पुणे येथील न्हावी गावातील दिंडीतून पायी मार्गक्रमण करीत आहेत.गेल्या चार वर्षांपासून चुंबळे ह्या पती प्रकाश चुंभळे यांच्या समवेत दिंडीत सहभागी होत आहेत.त्या म्हणतात ,समतेची शिकवण आणि अंगीकार करणारी ही वारी आहे.
चुंबळे यांना वारीत जाण्याची प्रेरणा त्यांचे सासरे रामदास शंकर चुंबळे व दिवंगत वडील किसन दगडू जवांजाळ यांच्याकडून मिळाली,सासरे सेवेत असताना त्यांना वारी करता आली नाही, तर वडील मूळचे पंढरपूरचे असताना रोजगारामुळे जव्हार येथे स्थायिक व्हावे लागले, त्या दोघांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पती सोबत वारी करीत आहे.दरम्यान या वारीचे संचालक ह. भ. प सतीश सोनवणे आहेत.७० वारकऱ्यांचा समावेश या दिंडीत आहे.८१ वर्ष वयाच्या विमल रामचंद्र भुतकर या मागील ४१ वर्षांपासून वारी करीत आहेत, ही देखील एक महत्त्वाची प्रेरणा ठरली.
अविवेकातून विवेकाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, विकारातून विचाराकडे आणि नुसत्या प्रकृतीतून उन्नत संस्कृतीकडे नेणारा आध्यात्मिक प्रवास म्हणजेच वारी. भक्तीशास्त्रात वारी म्हणजे अभीगमन, इष्टदेवाच्या सान्निध्यात जाणे, त्याच्या भेटीसाठी उत्सुकतेने पुढे चालत राहणे. वारी म्हणजे मानवी जीवनाच्या परिवर्तनाची वाट आहे, अशी भावना सेवा निवृत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक प्रकाश चुंबळे तथा त्यांच्या पत्नी जव्हार नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष कांचनमाला चुंबळे यांनी व्यक्त केली.
वारी करणारा तो ‘वारकरी’. त्याच्या आयुष्यात गळ्यातील तुळशीमाळ म्हणजे नवीन अध्यात्मिक जन्म. पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपणाऱ्या माझ्या घराण्यात, वारीशी जोडलेली आहे. मागील पिढ्यांनी सुरू केलेली पंढरीची वारी ही माझ्यासाठी केवळ परंपरा नव्हे, ती माझी साधना आहे. गेली चार वर्षे वारीचा नियम करत आहे, त्यात आषाढी पायवारी आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर असा प्रवास केला.
पूर्वीच्या तुलनेत आज वारीत अनेक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, वारीचा आत्मा तोच आहे, संयम, श्रद्धा, साधना आणि सामुदायिकत्व. येथे कोणी मोठं नाही, लहान नाही, जातपात नाही, अहंकार नाही, फक्त हरिनाम आहे. अभंग गायनातून नामस्मरण घडतं आणि पावले पंढरपूरकडे, पण मन चैतन्याच्या दिशेने वळतं. वारी म्हणजे शिस्तबद्ध लोकसंघटन. कोणतीही बाह्य व्यवस्था नसतानाही हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी केवळ मुख्य चोपदाराच्या आज्ञेवरून मार्गक्रमण करतात. प्रत्येक वारकरी स्वयंशिस्त पाळतो. लाखोंच्या संख्येमध्येही कुणी उपाशी राहत नाही, ही पांडुरंगाचीच कृपा! माझी वारी म्हणजे जीवनाच्या परिवर्तनाची वाट अशा प्रकारे चुंबळे दाम्पत्यांनी जपलीय पंढरीची वारी परंपरा.
वारी म्हणजे परमेश्वराच्या कृपेवर अखंड विश्वास. चिंता नको, चिंतन करा, भजन करा, ज्ञानोबा-तुकाराम आपल्या पाठीशी आहेत आणि पंढरीच्या वाटेवर आपला बाप पांडुरंग हा भेटीसाठी वाट पाहत उभा आहे.
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ।।
॥ विठ्ठल ॥ ॥ विठ्ठल ॥ ॥ विठ्ठल ॥