
बाळासाहेबांनी आपल्या जीवनात एकच गोष्ट मागितली होती. मराठी माणसाला त्याचा मान, आणि मराठी भाषेला तिचा स्थान. त्यांचं बोलणं कधी कटु असेल, पण त्यामागे असलेली भावना नेहमी स्वच्छ होती – “माझा महाराष्ट्र, माझा मराठी माणूस आणि माझी मराठी भाषा!” ते म्हणायचे, “इतर भाषांचा द्वेष नको, पण आपल्या भाषेवरचा प्रेमाचा गर्व असायलाच हवा.” आणि आज, जेव्हा आपण मराठी पाट्यांबद्दल बोलतो, तेव्हा तो केवळ नियमांचा मुद्दा नाही – ती आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. खरं सांगा – जर हा लढा बाळासाहेबांच्या अस्तित्वात जिंकता आला असता, तर त्यांचं उरलेलं आयुष्य अधिक शांत, अधिक समाधानाचं झालं असतं.
ते एक गोष्ट म्हणायचे – “मी माझ्या घरासाठी लढत नाही, मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय!”
…पण त्या लढवय्या योद्ध्याच्या घरातच जेव्हा फूट पडते, तेव्हा काळजाला चीर पडते.
आज हे मान्य करणं फार जड आहे – पण सत्य आहे – “ठाकरे कुटुंब एकसंध राहिलं असतं, तर महाराष्ट्राची ताकद कितीतरी पटींनी वाढली असती.” विभक्त होऊन सर्वांचंच नुकसान झालंय – हे कुणीही नाकारू शकत नाही.
बाळासाहेबांचं स्वप्न हे केवळ एखाद्या पक्षाचं नव्हतं – ते एका विचारधारेचं, एका संस्कृतीचं, आणि एका अस्मितेचं होतं. आज आपण जर त्यांच्या विचारांना खरंच मान देत असू, तर त्यांची खरी श्रद्धांजली हीच असेल. “मराठी माणूस एकवटला पाहिजे. भांडणं विसरून, भूतकाळ झटकून, भविष्यासाठी एकत्र यायला पाहिजे. आपण जर मनापासून बघितलं, तर अजूनही त्यांच्या डोळ्यांतून पाहिलेला महाराष्ट्र उभा करता येईल.
अभिमानाने म्हणणारा – “मी मराठी!”