
डोंबिवली ( शंकर जाधव )
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेची सामाजिक संदेश देणारी आषाढी वारी काढण्यात आली होती. वारकरी संप्रदायाच्या शेकडो वर्षाच्या परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून प्रवचनकार ह.भ. प.प्राची व्यास यांनी वारीचा इतिहास तसेच संत परंपरा, संतांची नावासहित माहिती गोष्टी रूपाने सांगितली. Dombivli News शाळेच्या पंडित दीनदयाळ सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी अभंग, गवळणी, कविता यांची माहिती सांगितली. आषाढी वारी विषयावरील माहितीपर प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा बोंडे, पर्यवेक्षिका जयश्री दौंड यांसह ज्येष्ठ शिक्षिका शशिकला कांबळे यांनी विठ्ठल आणि रखुमाईचे पूजन व औक्षण केले. विठ्ठल नामाच्या गजराने वारीला सुरुवात झाली. यात विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन ,विठ्ठल नामाचा गजर करत शाळा ते विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिर ते शाळा या मार्गाने वारी मार्गस्थ झाली.
विठ्ठल मंदिरामध्ये यश गोसावी या विद्यार्थ्याने अभंग म्हटला. इयत्ता सातवी मधील अनन्या चोरमल, उर्वी शिंदे व राशी कांबळे या विद्यार्थिनींनी विठ्ठलाचे भजन म्हटले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर नृत्य केले. विठ्ठल मंदिरातच वारीचे महत्त्व देखील सांगण्यात आले. वारी मध्ये फुगडी ला अतिशय महत्त्व असतं. कुमारी सिया पवार ,स्वरा घडशी , सिद्धी पवार यांसह अनेक विद्यार्थिनींनी फुगड्यांचा खेळ खेळला. वरद नलावडे आणि युगा भोजने यांनी विठ्ठल रखुमाई यांची तर संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार यांच्याही वेशभूषा करून विद्यार्थी वारीमध्ये सहभागी झाले होते. अशाप्रकारे विठ्ठल नामाचा गजर करत वारीचा समारोप शाळेमध्ये झाला.