
जव्हार :
गुरुवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे, दरम्यान तालुक्यातील वनवासी गावापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या कमी उंचीच्या मोरीहून रविवारी सकाळी ११ वाजेपासून पाणी वाहू लागल्याने मोक्याचा पाढा व वनवासी या दोन गावातील तेवीसशे नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
वनवासी गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत भरघोस उत्पादन घेऊन आपापली आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. मात्र, येथील नागरिकांनी शेतात पिकविलेले धान्य, भाजीपाला, फळे हे विक्री करिता जव्हार शहरात अगर मुंबई ,ठाणे, सेलवास पालघर, नाशिक सारख्या महानगरात पाठविण्याकरिता घेऊन जात असताना अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या कमी उंचीच्या मोरीमुळे येथील शेतकऱ्यांच्या विकासात नेहमीच अडथळा निर्माण होत असल्याची खंत येथील नागरिक करत आहेत.
हेही वाचा : Pradeep Nannaware : फुटपाथवर वाढणाऱ्या चिमुरडीसाठी ‘देवदूत’ ठरले प्रदिप नन्नवरे
गेल्या दहा वर्षांपासून वनवासी व मोक्याचा पाडा या दोन्ही गावातील नागरिकांनी या कमी उंचीच्या मोरीची उंची वाढवून चांगला रस्ता व्हावा याकरिता वारंवार मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद हे दोन्ही प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे येथील शेतमजूर, शेतकरी, शालेय विद्यार्थी, दैनंदिन रोजगारासाठी जव्हार आगर मोखाडा तालुक्यात जाणारे नागरिक प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या नियमित दिनक्रमाला मुकत आहेत, अशी माहिती वनवासी ग्रामस्थ गणपत गावंढा यांनी दिली.
वनवासी गावापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावरील रस्त्यावर च्या मोरीची उंची वाढविण्याकरिता संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
– हरिश्चंद्र भोये, आमदार