
मुंबई :
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम स्तराच्या सीए परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. अंतिम परीक्षेमध्ये देशातून मुंबईतील राजन काबरा अव्वल आला आहे. फाऊंडेशन परीक्षेमध्ये गाझियाबादमधील वृंदा अगरवाल, आणि इंटरमिजिएट परीक्षेत मुंबईतील दिशा गोखरू ही अव्वल आली आहे.
सीए अंतिम, फाऊंडेशन, इंटरमीडिएट या तिन्ही परीक्षा मे २०२५ रोजी घेण्यात आल्या होत्या. सीए अंतिम, इंटरमीडिएट या परीक्षा देशभरातून ५६४ केंद्रांवर घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी ग्रुप एक मधून ६६ हजार ९४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २२.३८ टक्के आहे. तर ग्रुप २ मधून ४६ हजार १७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १२ हजार २०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २६.४३ टक्के आहे. तसेच दोन्ही ग्रुपमधून परीक्षेला बसलेल्या २९ हजार २८६ पैकी ५ हजार ४९० विद्यार्थी उत्तीर्ण असून, उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण १८.७५ टक्के इतके आहे. या परीक्षेमध्ये मुंबईतील राजन काबरा याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवून देशात अव्वल आला. त्याखालोखाल कोलकाताची निशिता बोथ्रा हिने ५०३ गुण मिळवले तर मुंबईच्या मानव शहा याने ४९३ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
सीए इंटरमीडिएट परीक्षेमध्ये मुंबईतील दिशा गोखरू मिळवत अव्वल
सीए अंतिम परीक्षेपूर्वी सीए इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. आयसीएआयकडून मे २०२५ मध्ये घेतलेल्या या परीक्षेच्या ग्रुप १ मधून ९७ हजार ३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १४ हजार २३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण १४.६७ टक्के इतके आहे. तसेच ग्रुप २ मधून ७२ हजार ६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १५ हजार ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २१.५१ टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे दोन्ही ग्रुपमध्ये परीक्षा दिलेल्या ३८ हजार २९ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण १३.२२ टक्के इतके आहे. यामध्ये मुंबईतील दिशा गोखरू हिने ६०० पैकी ५१३ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. त्याखालोखाल संदीप देविदान याने ५०३ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. तसेच जयपूरचा यमिश जैन व उदयपूरचा निलय डांगी याने ५०२ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सीए फाऊंडेशन परीक्षेमध्ये गाझियाबादमधील वृंदा अगरवाल अव्वल
सीए फाऊंडेशन ही परीक्षा देशभरातून ५५१ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून ८२ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मुलांची संख्या ४३ हजार ३८९ आणि मुलींची संख्या ३९ हजार २७३ इतकी होती. परीक्षेला बसलेल्यांपैकी १२ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे हे प्रमाण १५.०९ टक्के इतके आहे. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ५६ इतकी असून, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १६.२६ टक्के तर मुलींची संख्या ५ हजार ४१८ इतकी असून, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १३.८० इतके आहे. फाऊंडेशन परीक्षेमध्ये देशातून गाझियाबादमधील वृंदा अगरवाल ४०० पैकी ३६२ गुण मिळवून अव्वल आली आहे. तसेच मुंबईतील यज्ञेश नारकरने ४४० पैकी ३५९ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ठाण्याचा शार्दुल विचारे याने ३५८ गुणांसह दुसरा क्रमांक पटकाावला आहे.