
मुंबई :
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरूनाथ पंडित, मुख्याध्यापिका संचिता गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे. याच शाळेतील शिक्षण आणि संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. माझ्या वक्तृत्वाची सुरुवातीची पावलं याच व्यासपीठावर पडली असल्याची आठवण सांगत, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मला आत्मविश्वास मिळाला. त्या संधींमुळेच मी घडलो, असेही नमूद केले. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
शाळेतील वर्गखोल्या, वाचनालय, चित्रकला विभाग आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शालेय जीवनात त्यांच्या सोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी ठरली.