शिक्षण

11th admission : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई :

पहिल्या फेरीची मुदत ७ जुलै रोजी संपल्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरण्यासाठी १० ते १३ जुलैदरम्यान अवधी देण्यात येणार आहे. तसेच १७ जुलै रोजी दुसऱ्या फेरीची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल

अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून १३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भाग १ मध्ये दुरुस्ती, नियमित फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. १७ जुलै रोजी दुसऱ्या फेरीची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. दुसऱ्या यादीमध्ये नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर २३ जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. याच कालावधीत कोट्यांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत ७ जुलै रोजी संपली. या फेरीमध्ये राज्यभरातून ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये विज्ञान शाखेतून सर्वाधिक १ लाख ४ हजार १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर त्याखालोखाल वाणिज्य शाखेतून ५८ हजार ९४८ आणि कला शाखेतून ३१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १ लाख २४ हजार ९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. यातील पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झालेल्या विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रद्द केले, यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेश घेऊन रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६१ इतकी आहे. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांनी ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *