
मुंबई :
उद्योन्मुख आणि प्रगत क्षेत्रासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने स्थापन केलेल्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन उत्कृष्टता केंद्र) या केंद्राचे उदघाटन आज गुरुवार (दि. १० जुलै २०२५, सकाळी १० वाजता) रोजी पार पडणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे आयोजित होत असलेल्या या उदघाटन समारंभास डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे (भा. प्र. से.), आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल (भा. प्र. से.), मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित हा उदघाटन समारंभ पार पडणार आहे. रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्या सहकार्याने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत असलेल्या या सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक रोबोटिक प्रणालींसह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला ‘एमटेक इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचबरोबर रोबोटिक्स सिस्टम, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत एप्लीकेशन्स, विद्यार्थी आणि संशोधकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रकल्पांवर काम करण्याच्या अनेक संधींचे दालन येथे खुले होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथील विस्तीर्ण केंद्रातील सुमारे ४५ हजार चौरस फुटावर हे सेंटर तयार करण्यात आले असून, हे केंद्र रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औद्योगिक ऑटोमेशनमधील संशोधन, विकास आणि प्रशिक्षणासाठी केंद्र म्हणून काम करणार आहे. उद्योन्मुख आणि प्रगत क्षेत्रातील गरजा आणि औद्योगिक आव्हानांवर मात करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून सहयोगी संशोधनास प्रोत्साहन दिले जाईल. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील कौशल्ये वृद्धीसाठी या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्या माध्यमातून तरुण अभियंते आणि विद्यमान औद्योगिक कर्मचार्यांना कौशल्ये देण्यासाठी संयुक्तपणे प्रमाणित रोबोटिक्स प्रोग्रामिंग/ऑपरेटर प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
विपस्सना मेडिटेशन सेंटरचे उदघाटन
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे पीएम-उषा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विपस्सना मेडिटेशन सेंटरचे उदघाटनही आज मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अद्ययावत सोयी-सुविधायुक्त या विपस्सना केंद्रात मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागामार्फत या शैक्षणिक वर्षापासून ‘डिप्लोमा इन परियत्ती अँड परिपत्ती इन पाली लिटरेचर’ आणि ‘डिप्लोमा इन विपस्सना भावना एज सीन इन पाली लिटरेचर’ हे एक वर्षाचे दोन नवीन अभ्यासक्रम या केंद्रात सुरु केले जात आहे.