
मुंबई :
जुलैपासून सर्व खासगी अंशत: अनुदानित शाळांना टप्पा वाढ करण्यात येईल, ही वाढ शिक्षकांना ऑगस्टच्या वेतनामध्ये मिळेल. तसेच अधिवेशन पूर्ण होईपर्यंत मागण्या मान्य होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आझाद मैदानात एकवटलेल्या हजारो शिक्षकांना बुधवारी रात्री न्याय मिळाला. त्यामुळे शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्यामध्ये जवळपास ५ हजार ८४४ खासगी अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान मिळावे यासाठी या शाळांमधील जवळपास २५ हजाार विद्यार्थ्यांनी दोन दिवस आझाद मैदानावर ठाण मांडले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत मागण्या मान्य केल्या.
राज्यातील ५ हजार ८४४ खासगी अंशत: अनुदानित शाळांना ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे टप्पा अनुदान लागू करण्यात यावे. यासाठी शिक्षक समन्वय संघामार्फत आझाद मैदानामध्ये ५ जूनपासून आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर अंशत: अनुदानित शाळांमधील २५ हजार शिक्षकांनी शाळा बंद ठेवून दोन दिवस आझाद मैदानात एकवटले होते. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पदवीधर मतदारसंघांतील काही आमदारांनी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राेहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळपासून आझाद मैदानामध्ये आंदोलकांसोबत ठाण मांडले होते. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय बळ मिळाले होते. बुधवारी सकाळी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने मैदानात झालेल्या चिखलामध्ये शिक्षक ठाण मांडून बसले होते. या चिखलाची तमा न बाळगता शरद पवार यांनी मागण्या मान्य होईपर्यंत पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन दिले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी १ वाजता त्यांना चर्चेसाठी बोलवले. पण नंतर त्यांनी सायंकाळी ५ वाजताची वेळ बैठकीसाठी दिली. या बैठकीदरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते, अशी माहिती शिक्षक समन्वयक संघाचे अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी आमची टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची मागणी मान्य केली. या मागणीचा शासन निर्णय निघाल्याने आता फक्त शासनाने अनुदानाचा निधी वर्ग करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार जुलै महिन्याचा टप्पा ऑगस्ट महिन्यात वर्ग करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे डावरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार रात्रभर थांबले आझाद मैदानात
टप्पा अनुदानासाठी ५ जूनपासून शिक्षक आझाद मैदानामध्ये आंदोलनाला बसले होते. मात्र त्यांच्या मागण्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर ८ व ९ जुलै रोजी राज्यातील ५ हजार ८४४ शाळांमधील शिक्षकांनी शाळा बंद ठेवून आझाद मैदानामध्ये दोन दिवस ठाण मांडले होते. शिक्षकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राजकीय पक्षांकडूनही त्यांना पाठिंबा दर्शविण्यात आला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राेहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत मैदानात ठाण मांडले होते. त्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून ते पुन्हा आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यानंतर ते अखेरपर्यंत आझाद मैदानामधून हटले नाहीत.