
मुंबई :
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यभरातून ८११७ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच २ लाख १३ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरला आहे.
संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रथमच राबविण्यात येत आहेत. १० जुलै २०२५ पासून दुसरी नियमित फेरी सुरु करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १३ जुलै २०२५ पर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-२ मधील पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दुसऱ्या नियमित फेरीच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून ८ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच २१३९७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरला आहे.
दरम्यान अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत ७ जुलै रोजी संपली. या फेरीमध्ये राज्यभरातून ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये विज्ञान शाखेतून सर्वाधिक १ लाख ४ हजार १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर त्याखालोखाल वाणिज्य शाखेतून ५८ हजार ९४८ आणि कला शाखेतून ३१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १ लाख २४ हजार ९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. यातील पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झालेल्या विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रद्द केले, यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेश घेऊन रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६१ इतकी आहे. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांनी ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले.