
ठाणे :
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय संजय राऊतांना घशाखाली अन्न जात नाही आणि सामनाचा पगार देखील मिळत नाही. राऊत आता भुंकत असून थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील, अशी सडकून टीका खासदार म्हस्के यांनी केली. उबाठा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मिडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखे बरळतात. लवकरच ते फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरणार असून नाईलाजाने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल, असा टोला खासदार म्हस्के यांनी केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार म्हस्के म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा काल दिल्लीत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे खासदार म्हस्के म्हणाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा काल वाढदिवस होता. शिंदे दिल्लीत असल्याने त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, असे खासदार म्हस्के म्हणाले.
खासदार राऊत जेव्हा दिल्लीत असतात आणि गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत, तेव्हा ते सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला, राहुल गांधी यांच्या घरी झाडू मारायला गेले होते, असे म्हणायचे का, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. उबाठाचे पक्ष नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का, याचे उत्तर राऊत यांनी द्यावे. राऊत यांनी उबाठा पक्षाचे वाटोळं केलं, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. मातोश्रीचे पावित्र्य उबाठाने नष्ट केलं त्यामुळे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांना वंदन करायला लोक मातोश्रीवर फिरकले नाहीत, असे खासदार म्हस्के म्हणाले.
हेही वाचा : Hotel Strike : करवाढीच्या विरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचा १४ जुलै रोजी बंदचा एल्गार
ते पुढे म्हणाले, उबाठाने सत्तेसाठी शिवसेनेचे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले. याउलट शिवसेनेने ८० जागा लढवल्या आणि ६० जागांवर विजय मिळवला.हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने हा पक्ष पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे यावर महाराष्ट्रातील लोकांनी शिक्कामोर्तब केलंय, असे खासदार म्हस्के यांनी म्हटले आहे. ऑगस्टमध्ये उबाठाला मोठं खिंडार पडेल, असे भाकित खासदार म्हस्के यांनी यावेळी केले. महायुतीत कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी महायुती अभेद्य आहे, असा पुनरुच्चार खासदार म्हस्के यांनी केला.