शहर

Mumbai Pune Expressway : मिसिंग लिंक अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे :

यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई- पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदचा असून देशातल्या सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.

हेही वाचा : Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबरमध्ये पहिले विमान घेणार ‘टेक ऑफ’

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *