आरोग्य

J.J.Hosptal : दिवसेंदिवस हृदय निकामी होत असलेल्या रुग्णावर जे.जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई :

बायकस्पिड एऑर्टिक व्हॉल्व्ह आणि तीव्र एऑर्टिक स्टेनोसिस या हृदयाच्या विकाराने त्रस्त असल्याने हृदय फारच कमी प्रमाणात कार्य करत होते. अशा गंभीर स्थितीमध्ये असलेल्या ५६ वर्षीय रुग्णाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यास अनेक खासगी रुग्णालयांनी नकार दिला. मात्र जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी धोका स्वीकारत यशस्वी उपचार करत त्याचे प्राण वाचवले.

कांदिवली येथे राहत असलेला ५६ वर्षीय व्यक्ती मागील वर्षभरापासून हृदय विकाराच्या आजाराने त्रस्त होता. त्याला बायकस्पिड एऑर्टिक व्हॉल्व्ह आणि तीव्र एऑर्टिक स्टेनोसिसचे निदान झाले होते. हृदयाची कार्य करण्याची क्षमताही दिवसेंदिवस कमी होत होती. त्याचे हृदय सतत निकामी होत होते. ही एक अत्यंत गंभीर आणि जवळपास अशक्य मानली जाणारी स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये उपचारासाठी संबंधित रुग्ण वर्षभरापासून उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये जात होता. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि मोठ्या प्रमाणात जीवाचा धोका असल्याने खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यास नकार देण्यात येत होता. त्यातच आता उपचार करण्यासाठी गाठीशी पुरेसे पैसेही नसल्याने तो जे.जे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाला. रुग्णाच्या सर्व तपासण्या केल्यानंतर जे.जे. रुग्णालयातील कार्डिओथोरासिक अँड व्हॅस्क्युलर सर्जरी (सीव्हीटीएस) विभागाचे डॉ. आशिष भिवापूरकर यांनी या रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत जीव वाचवणारी एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी पार पडण्यात आली. या शस्त्रक्रियेत सहभागी तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये डॉ. सूरज नागरे, डॉ. अमरीन शेख, डॉ. श्रुती दुबे, डॉ. झरीन रंगवाला, डॉ. अक्षयकुमार वर्मा, डॉ. रूता सुखारामवाला, डॉ. तनमय पांडे, तसेच शस्त्रक्रियागृहातील कर्मचारी वैशाली देगावकर व पूजा मोरे यांचा समावेश होता.

हेही वाचा : Education Department : मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर; अर्ध्याहून अधिक जागा रिक्त

डॉ. अश्विन सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखालील भूलतज्ज्ञ तुकडीने अत्यंत सुरक्षितपणे भूल दिली. तसेच मुख्य अभ्यासक राजू दौड यांनी शस्त्रक्रियेदरम्यान जीवनावश्यक अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थापन केले. शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर अनेकदा रुग्णांच्या हृदयाचे झालेले आकुंचन पुर्ववत करावे लागले, पण अतिदक्षता भूल विभाग आणि सीव्हीटीएस विभागाच्या तुकडीच्या समन्वयामुळे रुग्णावर उत्तम शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेपूर्वी चालताही येत नसलेल्या हा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर उत्तमरित्या चालू लागला. आता तो सामान्य जीवन जगत आहे. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आले.
– डॉ. आशिष भिवापूरकर, सीव्हीटीएस विभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *