
मुंबई :
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आला.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता सुनील नन्नावरे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर तसेच इतर विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, कोकण मंडळातर्फे मोठ्या संख्येने सदनिका आणि भूखंड उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. मुंबईच्या जवळच घरे असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या सोडत प्रणालीमध्ये सहभाग घ्यावा. तसेच ते पुढे म्हणाले की ‘म्हाडा’च्या संगणकीय सोडतीकरिता वापरण्यात येणारी IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आणि महत्वाचे म्हणजे पूर्णतः ऑनलाइन असल्याने मानवी हस्तक्षेपास यामध्ये वाव नाही. सोडत प्रक्रियेतील नोंदणी ते सदनिकेचा ताबा या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच केल्या जातात.
सोडत प्रक्रियेत अर्ज सादर करतेवेळी सोडत प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे नीट अवलोकन करून माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या रकमेइतकेच अनामत रकम उत्पन्न गटनिहाय ऑनलाइनच अदा करावे. तसेच ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत असल्याने म्हाडा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे रोख रकमेची मागणी केली जात नाही, याची इच्छुक अर्जदारांनी नोंद घ्यावी. सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोकण मंडळ अथवा म्हाडा अथवा मंडळाचे प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे मंडळाच्या मुख्य अधिकारी गायकर यांनी सांगितले. तसेच सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे ०२२ – ६९४६८१०० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अर्जदारांना सावधानतेचा इशारा
सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. म्हाडाच्या सदनिकांचे वितरण हे केवळ संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता https://housing.mhada.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ असून या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांनी सोडतीत सहभाग घेऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले
पाच घटकांमध्ये सोडतीची विभागणी
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
३ सप्टेंबर रोजी होणार सोडत जाहीर
सोडतीसाठी १३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. १४ ऑगस्ट २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर देखील प्राप्त होणार आहे.