शिक्षण

चक्क टेम्पोमधून होतेय शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक; वाहतूक नियमांची पायमल्ली

डोंबिवली ( शंकर जाधव) : 

शालेय विद्यार्थ्यांना व्हॅन व रिक्षातून वाहतूक करताना शासनाने सुरक्षतेचे नियम लागू केले आहे. मात्र या नियमांची पायमल्ली करत कल्याण पूर्वेत चक्क टेम्पोतून विद्यार्थी वाहतूक करण्यात आली. ना आसनव्यवस्था ना सुरक्षिततेची सोय… अशा वेळी वाहनचालकाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याने त्याच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कल्याण पूर्व येथील पत्रीपूल परिसरात विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसन व्यवस्था नाही. त्याचे दरवाजेही पूर्णपणे बंद होत नाहीत आणि धक्कादायक म्हणजे, मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही सहाय्यक सोबत नाही. चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्या धरून उभे आहेत. जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला, तर या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाच्या अवघ्या ५ किलोमीटर परिसरातून विद्यार्थी एका टेम्पोमधून अशा जीवघेण्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे.एकही वाहतूक पोलीस व आरटोच्या अधिकाऱ्यांना याची माहिती नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : एसटी स्वायत्त संस्था आहे, एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल म्हणाले, कल्याण आरटीओकडून सर्व शाळांना एक परिपत्रक काढण्यात आले आहे की, आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी हे योग्य कागदपत्र असलेल्या वैध वाहनातून वाहतूक करून शाळेत येत आहेत का याची पडताळणी करावी. शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष हे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असल्याने त्यांची जबाबदारी आहे की वैध कागदपत्र असलेल्या वाहनातून येत आहेत की नाही. तसेच सर्व पालकांना आवाहन आहे की आपला पाल्य हा सुखरूपपणे शाळेत जातोय की नाही हे पाहण्याकरता ज्या वाहनातून आपले पाल्य जात आहे, त्या वाहनाचे कागदपत्र mparivahan ॲपच्या माध्यमातून बघू शकता. आरटीओच्या माध्यमातून जनजागृतीकरण्यासाथी परिपत्रक काढण्यात आले आहे. मागील महिन्यात जिल्हा स्कुल समितीची बैठक घेण्यात आली आहे. टेम्पोतून विद्यार्थी वाहतूक होत असेल तर तशी तक्रार आरटीओच्या ऑनलाईन कॉम्लेट क्रमांकावर करावी अथवा आरटीओच्या मेलवर तक्रार नोंदवावी.तक्रार प्राप्त होताच दोषी आढळल्यास त्या वाहनचालकावर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *