
मुंबई :
विज्ञान भारती आयोजित ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ २०२४-२५ च्या ‘श्रृजन’ इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी दिनांक ११ जुलै रोजी मुंबई विद्यापीठाला भेट दिली. विज्ञानाची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी ही भेट एक अविस्मरणीय अनुभव ठरली. देशभरातील या पात्र निवडक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठातील एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री सेंटर, नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी आणि सेंटर फॉर बेसिक सायन्स येथील अद्ययावत संशोधन प्रयोगशाळा, नवोपक्रम केंद्रे, उपकरणे आणि चालू असलेल्या संशोधनाविषयी सखोल माहिती करुन घेतली. या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
विज्ञानाच्या विविध शाखांमधील प्रगतीची आणि भविष्यातील शक्यतांची कल्पना जाणून घेण्यास अनेक विद्यार्थ्यांची कुतुहलता आणि जिज्ञासा स्पष्ट दिसून येत होती. या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांसाठी विशेषत: त्यांच्या इयत्तेनुसार हँड्स-ऑन-अॅक्टिव्हिटीजचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास या विद्यार्थ्यांना मदत झाली. या भेटीत देशभरातील ६० विद्यार्थी आणि १५ आयोजक सहभागी झाले होते. स्कूल कनेक्टच्या धर्तीवर देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा : अकरावी दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ हा विज्ञान भारतीचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, या उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता ६ वी ते ११ वी मधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि कुतुहल निर्माण करण्यास हातभार लागतो. यावर्षीच्या निवड प्रक्रियेनंतर देशभरातील १८ राष्ट्रीय विजेते आणि ७२ विभागीय विजेते ‘श्रृजन’ इंटर्नशिपसाठी पात्र ठरले होते. ७ ते १२ जुलै २०२५ या कालावधीत मुंबईत आयोजित या कार्यक्रमासाठी विज्ञान भारती मुंबई ही यजमान संस्था आहे. मुंबई विद्यापीठाच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीला निश्चितच नवी दिशा मिळू शकेल असा आशावाद आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. तसेच या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र असलेल्या मुंबईतील महत्त्वाच्या संस्थांशी जोडले जाण्याची अविस्मरणीय संधी मिळाली असून यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी आणि भविष्यात विज्ञानाचे क्षेत्र निवडण्यासाठी त्यांना प्रोत्साहनही मिळाले असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.