
मुंबई :
भांडणात मध्यस्थी केली म्हणून एका तरुणावर तीन ते चारजणांच्या एका टोळीने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रोहित नेतकर हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर ठाण्यातील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयांत समीर मोहम्मद सलीम खान याला पोलिसांनी अटक केली तर इतर आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा : म्हाडाची ५ हजार घरांची सोडत; १३ ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख
ही घटना गुरुवारी मध्यरात्री उशिरा सव्वादोन वाजता घाटकोपर येथील आझादनगर, एसआर आंबेडकर सोसायटीजवळ घडली. रामसागर राकेशकुमार शर्मा हा याच परिसरात राहत असून जखमी रोहित हा त्याचा मित्र आहे. गुरुवारी रात्री रामसागर आणि समीर यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणात रोहितने मध्यस्थी करुन त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने समीरसह इतर आरोपींनी रोहितला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या किस्म रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रामसागर शर्माच्या तक्रारीवरुन पोलिसांनी समीरसह इतर आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या समीरला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचे इतर सहकारी पळून गेल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.