
शहरातील वातावरणामध्ये सध्या कमालीचा होत आहे. ऊन-पावसाच्या खेळामुळे अनेक लोक आजारी पडू लागले आहेत. याव्यतिरिक्त ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (सीआरईए) या संस्थेने गेल्या सहा महिन्यातील देशातील २३९ शहरातील हवेची गुणवत्ता तपासून त्याबाबतचा अहवाल देखील समोर आला आहे. त्यामध्ये, मुंबईतील हवेत २.५ या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील सायन, देवनार, कांदिवली, बोरिवली, माझगाव आदी भागातील हवा चेन्नई, कोलकाता या शहरांपेक्षा जास्त प्रदूषित झाल्याची धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे.
मुंबई महापालिकेने शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी काही नियम केले होते. मात्र अनेक विकासकांनी इमारतींची बांधकामे करताना नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे प्रदूषण वाढीस लागले. हवेची गुणवत्ता ढासळली. प्रदूषण रोखण्याची मुख्य जबाबदारी महापालिकेने ज्या संबंधित अधिकाऱ्यांवर टाकली होती, त्यांनी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे प्रदूषण वाढले आणि मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यानंतरही हवेची गुणवत्ता राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिका आयुक्तांनी संबंधित वार्डातील सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरावे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.