
मुंबई :
पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांमध्ये दरवर्षी वाढ होते. यंदा मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्याने साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये जूनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जूनमध्ये हिवताप व गॅस्ट्रोच्या आजारांनी डोके वर काढले होते. त्या तुलनेत जुलैमध्ये हिवताप, लेप्टो व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांमध्ये हिवतापाचे ६३३ रुग्ण सापडले तर लेप्टोचे ३५ रुग्ण आणि चिकुनगुनियाचे ४३ रुग्ण सापडले आहेत. तसेच साथीच्या आजरांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून जुलैमध्ये तब्बल ६ लाख ७० हजार १३ घरांचे सर्वेक्षण केले.
जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागते. मात्र यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे हिवताप, डेंग्यू, अतिसार आणि चिकुनगुनियाच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही जूनच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये जूनमध्ये हिवतापाचे ८८४ रुग्ण सापडले होते. त्यातुलनेत जुलैच्या १५ दिवसांमध्ये ६३३ रुग्ण सापडले आहेत. तसेच जुलैमध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने जूनच्या तुलनेत जुलैमध्ये लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये लेप्टोचे ३६ रुग्ण तर जुलैमध्ये आतापर्यंत ३५ रुग्ण सापडले आहेत. चिकुनगुनियाचे जूनमध्ये २१ तर जुलैमध्ये ४३ रुग्ण म्हणजेच दुपटीने वाढ झाली आहे. जूनमध्ये अतिसाराचे सर्वाधिक ९३६ रुग्ण सापडले असताना जुलैमध्ये आतापर्यंत फक्त ३१८ रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येत काहीअंशी घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जुलैमध्ये डेंग्यूचे २८२, करोनाचे १२७ आणि हेपेटायटिसचे ४० रुग्ण सापडले आहेत.
शून्य डास उत्पत्ती मोहीम सुरू
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण केंद्राचे संचालक, कार्यक्रम व्यवस्थापक आणि कीटकशास्त्रज्ञ यांनी जुलैमध्ये मुंबईला भेट दिली होती. या भेटीच्या अनुषंगाने महानगरपालिका रुग्णालय आणि इतर कार्यालयांमध्ये ‘शून्य डास उत्पत्ती मोहीम’ सुरू करण्यात आलेली आहे. तसेच व्यापक प्रमाणात मच्छरदाणीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
काय काळजी घ्याल
हिवताप, डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी घरामध्ये, घराच्या आसपास कोठेही पाणी साचणार याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात तसेच जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर अशा अडगळीतील वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तातडीने पाण्याचा निचरा करावा. लेप्टोच्या प्रतिबंधासाठी पावसाच्या साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येणे टाळा. गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून प्या.
हेही वाचा : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी काही नियम केले होते. मात्र…
दोन महिन्यांमधील रुग्ण संख्या
जुलैमध्ये हिवतापाचे सर्वाधिक ६३३ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल गॅस्ट्रोचे ३१८ रुग्ण, डेंग्यूचे २८२, करोनाचे १२७, चिकुनगुनियाचे ४३, हेपेटायटिसचे ४० आणि लेप्टोचे ३५ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे जूनमध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक ९३६ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल हिवताप ८८४ रुग्ण, करोना ५५१ रुग्ण, डेंग्यू १०५ रुग्ण, हेपॅटायटिसचे ७८ रुग्ण, लेप्टोचे ३६ रुग्ण आणि चिकुनगुनियाचे २१ रुग्ण सापडले होते.
नागरिकांनी ताप आल्यास घराजवळील महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, स्वत: औषधे घेणे टाळा,
– डाॅ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका