शहर

एसटीच्या इलेक्ट्रिक बसना पुणे मार्गावर महिन्याला ७० लाख रुपयांच्या टोलचा भुर्दंड

टोल माफीची घोषणा झाली, अंमलबजावणी कधी? - श्रीरंग बरगे यांचा सरकारला सवाल

मुंबई :

मुंबई व ठाण्यातून पुण्याला जाणाऱ्या – येणाऱ्या एसटीच्या एकूण साधारण १०० इलेक्ट्रिक बस सुरू असून त्यातील काही बसेसना जाऊन, येऊन प्रति फेरी प्रति बस १८८० तर काही बसना प्रति फेरी, प्रति बस २०४५ रुपये इतका टोल भरावा लागत आहे. त्यामुळे एसटीला पुणे मार्गावर महिन्याला एकूण अंदाजे ७० लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असून इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली पण त्याचे परिपत्रक सरकार कधी काढणार? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारला विचारला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या परळ आगारात दादर- पुणे मार्गावर धावणाऱ्या एकूण २६ इलेक्ट्रिक बसेस आहेत. एका बसच्या दिवसभरात ०३ फेऱ्या होत असून त्यानुसार २७ बसेसच्या ८१ फेऱ्या होतात. त्याचप्रमाणे स्वारगेट आगाराच्या एकूण ३३ बसेस आहेत. एका इलेक्ट्रिक बसच्या दिवसभरात ०३ फेऱ्या होत असून त्यानुसार ३३ बसेसच्या प्रतिदिन एकूण ९९ फेऱ्या होतात. ठाणे आगारात एकूण १५ बसेस असून एका बसच्या दिवसभरात ०३ फेऱ्या होतात त्यानुसार १५ बसेसच्या ४५ फेऱ्या होतात. बोरिवली स्थानक येथे ०८ बसेस आहेत. एका बसच्या दिवसभरात ०३ फेऱ्या होत असून त्यानुसार ०८ बसेसच्या २४ फेऱ्या होतात. पुणे स्टेशन येथे १७ बसेस आहेत. एका इलेक्ट्रिक बसच्या दिवसभरात ०३ फेऱ्या होत असून त्यानुसार १७ बसेसच्या ५१ फेऱ्या होतात. याशिवाय अटलसेतू मार्गे बस गेल्यास स्वारगेट येथे जाण्यासाठी ३१२५ व चिंचवड येथे जाण्यासाठी ३२९० रुपये इतका टोल भरावा लागतो.

हेही वाचा : मुंबईमध्ये हिवताप, लेप्टो, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या दृष्टीने विजेवरील गाड्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या पाहिजेत या दृष्टीने विजेवरील गाड्यांना टोल माफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून एसटीच्या दृष्टीने तो फायदेशीर ठरू शकतो. पण सरकारने या संदर्भातील परिपत्रक तत्काळ जारी केले तर बरे होईल. टोलच्या या भयंकर जोखडातून एसटी मुक्त होईल. त्यामुळे या संदर्भातील परिपत्रक तत्काळ जारी करण्यात आले पाहिजे, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *